विशाल माने/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर : पारंपरिक पिकांना बगल देत गेल्या तीनचार वर्षांपासून माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे येथील शेतकर्यांनी आपला कल द्राक्ष उत्पादनाकडे वळविला. ऐपतीनुसार शेतामध्ये व राजेवाडी तलावानजीकपाण्याचे स्रोत निर्माण करून शेतकरी हळूहळू बागायती पिकांकडे वळू लागले होते. द्राक्षबागेच्या लागवडीचा खर्च अधिक असला, तरी ठोक उत्पन्न देणारे हे पीक असल्याने गेल्या तीनचार वर्षांमध्ये द्राक्ष लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढला होता. मात्र निसर्गाची अवकृपा होत राहिल्याने द्राक्षबागायतदारांपुढे पाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
सुरुवातीच्या लागवडीपासून ते फाउंडेशनची उभारणी करेपर्यंत एकरी सुमारे पाच लाखापर्यंत खर्च येणार्या या पिकावर दुष्काळामुळे संकट कोसळले आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. बोअर, विहिरी आदी पाण्याचे स्रोत मार्च महिन्यातच कोरडेठाक पडल्याने द्राक्षबागांना पाणी मिळणे कठीण झाले. काही शेतकर्यांच्या बागांना गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी न मिळण्यामुळे त्या द्राक्षबागांची यंदाच्या हंगामात फळधारणा झाली नाही. तर काही शेतकर्यांच्या बागांना यंदाच्या हंगामात प्रारंभी पीक लागले. मात्र, ऐन वाढीच्या अवस्थेतच पाणी न मिळाल्याने द्राक्षाचे कोवळे घड अक्षरश: सुकून गेले.
तशातच या पुढील काळात या द्राक्षबागा कशा जगवायच्या या चिंतेने ग्रासलेल्या शेतकर्यांपुढे त्यांना कुर्हाड लावणे हाच पर्याय उरला आहे. वरुणराजा बरसला नसल्याने देवापुर -पळसावडे परिसरातील 200 -250 एकरहुन अधिक माळरानावरील द्राक्ष क्षेत्राचा द्राक्ष हंगाम वाया जाणार कि काय ?अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी द्राक्ष बागांची कामे रखडली असून उरमोडीचे पाणी माणगंगा नदीपात्रात आले खरे पण नदीपात्रापासून राजेवाडी तलावाच्या दक्षिणेकडे परिसरातील शेतकर्यांच्या विहिरी असल्याने परकॉलेशन होणे कठीण आहे. त्यासाठी तलावामध्ये उरमोडीच्या पाण्याचा साठा होणे आवश्यक आहे, असे शेतकर्यांमधून बोलले जात आहे.
जिगरबाज नेत्यांनी उरमोडीचे पाणी आणण्यासाठी केलेले प्रयत्न फळाला आले खरे पण माणगंगा नदीपात्रापासून दक्षिणेकडे माळरानावर लावणार्या द्राक्ष बागायत शेतकर्यांचे कष्ट फळाला येईल का ? हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल
तर ‘दुष्काळात तेरावा’ ठरेल..
राजेवाडी तलावात शासनाला पाणी साठा ठेवावा लागेल शेतकर्यांना बागा धरायच्या आहेत. परंतु विहिरीत पाणीच नसल्याने या अस्मानी संकटाला तोंड द्यायचे कसे ? तलावात पाणीसाठा न झाल्यास शेतकर्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना ठरेल.
-शहाजी बाबर, माजी सरपंच ग्रामपंचायत देवापूर
No comments:
Post a Comment