माजी सार्वजनिक बांधकाम , पर्यटन मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सन्मानासाठी पाटण खोरे सज्ज - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, December 19, 2018

माजी सार्वजनिक बांधकाम , पर्यटन मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सन्मानासाठी पाटण खोरे सज्ज


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क   
पाटण (संजय कांबळे ) 
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते,  महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम , पर्यटन मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर(दादा) यांनी गेले ४० वर्षांच्या आपल्या राजकीय  जीवनात पाटण तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले, विधानसभा मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा करून मतदारसंघाचे रूपडे पालटले, तालुक्यातील जनतेसाठी निस्वार्थीपणे काम करत कोणतीही अपेक्षा न ठेवणाऱ्या या लोकनेत्याचे अभिष्टचिंतन करण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर रोजी पाटण येथे त्यांचा अमृतमहोत्सव गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष , माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचेसह , राज्य आणि जिल्ह्यातील दिग्गज मान्यवर नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित रहाणार  आसल्याची माहिती अमृतमहोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष व पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी पाटण येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष शंकरराव जाधव, नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, सुभाषराव पवार, धैर्यशील पाटणकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राजाभाऊ शेलार पुढे म्हणाले, श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या राजकीय करकिर्दित पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास केला. खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपली यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचाल केली. तालुक्यातील धरणे, सहकारी, शैक्षणिक व अन्य संस्था, सिंचन व्यवस्था, पर्यटन, पुर्नवसनासाठी  विशेष प्रयत्न करून तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. तालुक्यातील डोंगर द-यातील वाडी वस्तीवरील अवघड घाट  फोडून दळणवळणासाठी रस्त्याचे जाळे विणले, तारळी, मोरणा-गुरेघर, वांग-मराठवाडी ,महिंद, साखरी- चिटेघर, निवकणे या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी आणला, या प्रकल्पामुळे शेती व सिंचनाची सोय झाली, कोयनानगर येथे नेहरू गार्डन ची निर्मिती करून त्या ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले, आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प वनकुसवडे ,सडावाघापूर डोंगर पठारावर साकारून तालुक्यातील हजारो बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला,
सुसंस्कृत शांत संयमी  स्वच्छ प्रतिमा जपत महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या अशा उत्तुंग कार्य करणा-या नेत्याचा महासन्मान हा खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्तेच व्हावा ही तालुक्यातील तमाम कार्यकर्तांची,जनतेची  अपेक्षा होती. त्याचप्रमाणे या गौरव सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले आहे. या गौरव सोहळ्यासाठी  खा. शरदचंद्रजी पवार यांचेसह विधान परिषद सभापती ना. रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले , खा. विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सुनिल तटकरे,आ.भास्कर जाधव, आ. हसन मुश्रीफ, माजी मंत्री विलासराव पाटील(उंडाळकर) श्रीमंत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण, सातारा जि.प. चे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,शेखर निकम, सारंग पाटील आजी, माजी खासदार, आमदार, पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदार संघात विविध   कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय हॉलीबॉल, कबड्डी,क्रिकेट, कुस्ती, शरीर सौष्ठव स्पर्धा, रक्तदान व आरोग्य शिबिरे, फळे वाटप, आदी बहुसंख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या प्रांगणात हा अमृतमहोत्सव गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यासाठी तमाम जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही शेवटी राजाभाऊ शेलार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment