पोलिस पाटील जनता- प्रशासनातील महत्वाचा दुवा -अंगद जाधवर - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, January 1, 2019

पोलिस पाटील जनता- प्रशासनातील महत्वाचा दुवा -अंगद जाधवर


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

पाटण/ संजय कांबळे :- पोलीस पाटील हा पोलीस व जनतेमधील महत्वाचा दुवा असतो, पोलीस पाटलांनी आपल्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सर्वसामान्य जनतेस न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याचे भान ठेवून पोलीस पाटील बांधवांनी सर्वसमावेशक काम करावे. असे प्रतिपादन पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर यांनी केले. नवारस्ता ता. पाटण येथील कृष्ण लीला मंगल कार्यालयात पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित पोलीस पाटील ओळखपत्र वितरण निवृत्त पोलिस पाटलांचा सत्कार समारंभ  मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,मल्हारपेठचे स. पो.नि. दिगंबर अतिग्रे,स.पो. फौजदार संतोष कोळी, पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कदम यांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना जाधवर पुढे म्हणाले की, मी यापुवीॅ पाटण पोलीस टेशन ला पीएसआय असताना  तालुक्यातील कोणत्याही गावातील पोलीस स्टेशनला तक्रार आल्यास सदर गावातील पोलीस पाटलांना बोलावून स्वतः माहिती घेऊन शहानिशा करत होतो, जनतेचा विश्वास पोलीस पाटलावर असतो, त्या विश्वासास तडा न जाता सर्वसामान्य जनतेशी एकरूप होऊन पोलीस पाटलांनी आपले काम चोखपणे करावे,, जोपर्यंत पब्लिकचे प्रेशर व पत्रकारांचे प्रेशर येत नाही तोपर्यंत आमच्या सारखे अधिकारी काम करत नाहीत, काही अधिकार्‍यांना सवय झालेली असते स्वतःला किंग समजायची, अधिकाऱ्यांना पत्रकार आरसा दाखवण्याचे काम करत असतात, जनतेच्या मनामध्ये गुलामगिरीची मानसिकता झालेली आहे, याचा फायदा शासकिय यंत्रणा घेत आहे. आज सर्वत्र जनतेची पिळवणूक होत आहे कारण, लोकांच्या मनामध्ये गुलामगिरीची मानसिकता झालेली आहे. काही काम न करता भांडत बसण्यापेक्षा कर्तव्यामध्ये कसूर न करता काम करा व ते काम परिपूर्ण करा,अशी खंत व्यक्त करत ते पुढे म्हणाले की पोलीस पाटील हा पोलीस खात्याचा अविभाज्य घटक आहे, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते, गावातील अन्याय झालेल्या कुटुंबाची तक्रार तात्काळ पोलीस स्टेशनला देऊन त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे काम पोलीस पाटलांनी केले पाहिजे, फक्त पगारवाढीसाठी मानधनासाठी भांडू नये कर्तव्य श्रेष्ठ आहे सामाजिक जाणीव ठेवून काम करावे, अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम पोलीस पाटील बंधू-भगिनींनी करावे असे आवाहनही शेवटी अंगद जाधवर यांनी केले.


यावेळी बोलताना प्रांताधिकारी श्रीरंग तांबे म्हणाले की, महाराष्ट्र अधिनियम 1967 अन्वये पोलीस पाटील पदांची निर्मिती झाली, 286 पदांची जाहिरात काढली, त्यापैकी 145 पदांची भरती झाली, बाकी पदे रिक्त राहिली आहेत, नजीकच्या काळात ही रिक्त पदे भरून घेऊ, पाटण तालुका दुर्गम डोंगराळ तालुका आहे, शासनाचा प्रतिनिधी म्हणून पोलिस पाटील काम करत आहेत, अशा दुर्गम भागात पोलीस पाटलावर काम करण्याची मोठी जबाबदारी आहे, गावामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस पाटलांनी तात्काळ प्रशासनाला कळवावे, तसेच पुर्व होणार्‍या घटनेची माहिती मिळताच ते थोपविण्यासाठी प्रयत्न करावेत, पोलिस पाटील म्हणून आपली स्वातंत्र्य ओळख आहे, कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन आपण कोणत्याही राजकीय पक्ष गटाचा न रहाता जनतेचा दुवा म्हणून काम केले पाहिजे, आपल्या काही अडीअडचणी असल्यास त्यावर तोडगा काढला जाईल, पोलीस पाटील यांनी एका दिलाने पोलिस पाटील म्हणून निपक्षपातीपणे काम करावे असे आवाहन शेवटी केले.यावेळी सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच  नवनिर्वाचित पोलीस पाटील यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.यावेळी माजी  पोलीस पाटील शामराव गालवे,पोलिस पाटील नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष सुभाष कदम यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन संभाजी चाळके यांनी तर आभार राहुल सत्रे यांनी मानले. या मेळाव्यास पाटण ,मल्हारपेठ, कोयना, ढेबेवाडी, तारळे उपविभागातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment