पवारांच्या विरोधात माढ्यातून डॉ. येळगावकर शड्डू ठोकणार? - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, March 8, 2019

पवारांच्या विरोधात माढ्यातून डॉ. येळगावकर शड्डू ठोकणार?


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


मायणी : बहुचर्चित माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार पुन्हा एकदा उभे रहाणार आहेत. या मतदारसंघात त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करून पवारांना पराभूत करण्याचा विडा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उचलला असून पवारांच्या विरोधात भाजपची मुलुख मैदानी तोफ डॉ. दिलीप येळगावकर यांनी शड्डू ठोकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, येळगावकरांनी लढावे यासाठी नुकतीच प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. येळगावकर यांना उमेदवारी द्यावी यासाठी पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


माढा मतदारसंघात येळगावकर यांच्या माण-खटावसह फलटण, माळशिरस, करमाळा, माढा हे मतदारसंघ येतात. याच मतदारसंघातून यापूर्वी शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. मोठ्या मताधिक्याने ते निवडूनही आले होते. परंतु, त्यानंतर त्यांच्याकडून या मतदारसंघात म्हणावेसे लक्ष न दिले गेल्याने त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे भाजपकडून पुन्हा एकदा पवारांच्या विरोधात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना उतरवले जाण्याची शक्यता असली तरी सध्या देशमुख हेही अडचणीत आहेत. त्यामुळे येळगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी उचल खाल्ली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी ही मागणी जुनीच असून दहिवडीचे युवा नेते संदीप महाडिक यांनी या मागणीवर जोर धरला होता. मध्यंतरी ही चर्चा थंडावली. परंतु, डॉक्टरांनी लोकसभा लढवावी, असा मतप्रवाह कार्यकर्त्यांमध्ये वाढला आहे.


पवारांविरोधात लढणे सोपे नसले तरी पाणीप्रश्‍नाची जाण असणारा नेता म्हणून असलेल्या बळावर व देशात पुन्हा निर्माण होऊ घातलेल्या मोदी लाटेत येळगावकर जायंट किलर ठरू शकतात, अशी खात्री कार्यकर्त्यांना असल्याने त्यांनी रिंगणात उतरावे, यासाठी प्रमुख पदाधिकार्‍यांनी त्यांना गळ घातली आहे. एकीकडे बोराटवाडीत आघाडीतीलच परंतु पवार विरोधकांनी बैठक घेत दबाव निर्माण केला आहे. दुसरीकडे मोहिते-पाटलांनी जरी शरद पवारांना गळ घातली असली तरी त्यांचा गट अंतर्गत नाराज आहे. शिवाय माणमधून शेखर गोरे, फलटणमधून दिगंबर आगवणे यांची भूमिका, काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात घेतलेली भूमिका यामुळे माढ्यातील लढत रंगतदार होणार आहे हे नक्की

पक्ष- कार्यकर्ते सांगतील ती भूमिका
दरम्यान, याप्रकरणी डॉ. येळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन व पक्षाने जबाबदारी दिली तर मी विचार करेन, असे सांगून अप्रत्यक्षरित्या खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment