फलटणला चक्रपाणी स्वामींच्या जयघोषात घोड्याची यात्रा संपन्न - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, April 24, 2019

फलटणला चक्रपाणी स्वामींच्या जयघोषात घोड्याची यात्रा संपन्न

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

फलटण :-  येथील श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेच्या (घोड्याची यात्रा) मुख्य दिवशी आज (बुधवार दि. 24 एप्रिल) ढोल, लेझीम, ताशांच्या निनादात गोपालकृष्ण महाराज आणि चक्रपाणी स्वामींच्या जयजयकारात गुलालाच्या उधळणीत मोठ्या उत्साही वातावरणात श्रींच्या पालखीसह ग्रामप्रदक्षिणा संपन्न झाली.

महानुभाव पंथियांची दक्षिण काशी असलेल्या फलटण येथे   श्रीकृष्णनाथ, श्री आबासाहेब, श्री बाबासाहेब, जन्मस्थान (अवस्थान मंदिर), रंगशीळा, श्रीदत्त वगैरे 6 मंदिरे असून या सर्व मंदिरामध्ये यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र, कर्नाटक, पंजाब, दिल्ली राज्यातून आलेल्या भाविकांनी गेले 5/6 दिवस मोठी गर्दी केली आहे. श्री आबासाहेब मंदिर येथे पालखी पूजन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा निताताई मिलिंद नेवसे, सन्माननीय उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण शहर अध्यक्ष मिलिंद राजाराम नेवसे (आप्पा), मा.उपसभापती विवेक शिंदे उपस्थित होते. फलटण नगर परिषद विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, बागायतदार संदीप पाटील, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक  प्रताप पोमण, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्यामसुंदर विद्वांस शास्त्री किसन शिंदे, महंत सुदामबुवा विद्वांस, अर्जुन नाळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यास उपस्थित होते. 


त्यानंतर दुपारी 1.30 वाजता पालखीसह ग्रामप्रदक्षिणा सुरु झाली.  यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  श्यामसुंदर विद्वांस शास्त्री, विश्‍वस्त सुदामराव विद्वांस, अर्जुन नाळे यांच्यासह   संत महंत, उपदेशी आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री चक्रपाणी वार्षिक यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र पौर्णिमा शुक्रवार दि. 19 एप्रिलपासून सुरु झाली असून दररोज अभिषेक, गीता पठण, प्रवचन, उपहार आणि रात्री छबिना असे धार्मिक विधी सर्व मंदिरात सुरु आहेत. दररोज सायंकाळी श्रीकृष्णनाथ मंदिरातून निघालेला छबिना आबासाहेब मंदिरात वाद्याच्या निनादात पोहोचतो त्यामध्येही भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात.


शहरातील सर्व मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. दुपारी पालखी मिरवणूकीसाठी सज्ज झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महास्थानाचे व पालखीचे पूजन व आरती होऊन श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंदप्रभू, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत पालखी सोहळा नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. श्रींची पालखी मिरवणूक सुरु होताना पालखीपुढे मानकरी डोक्यावर पितळी घोडे घेऊन या सोहोळ्यात सहभागी झाले होते. ज्यांना भूत, पिशाच्च बाधा झाली असे भक्तगण श्रींच्या भक्तीरसात तल्लीन होऊन पालखी समोर लोटांगण घेत या सोहोळ्यात सहभागी होतात. यात्रेच्या निमित्ताने चौकाचौकात मेवा मिठाईची, खेळण्यांची त्याचप्रमाणे नारळ आणि पूजेच्या साहित्याची दुकाने  थाटण्यात आली होती. पालखी सोहोळ्याच्या मार्गावर आणि मंदिरालगत शहरातील विविध तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे, विविध मठ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भक्त मंडळींसाठी पिण्याच्या पाण्याची,  थंड सरबताची मोफत व्यवस्था केली होती. काही ठिकाणी मिष्ठान्न भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.  पालखी मार्गावर नगर परिषदेच्यावतीने पाणी टाकून उन्हाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच त्या परिसरातील नळांना जादा पाणी सोडून भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नगर परिषदेने केली होती.

No comments:

Post a Comment