फलटण: दारात कुलर लावून रात्री दार उघडे ठेवून झोपणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. डुलका लागलेल्या वेळेत अज्ञात चोरट्याने घरात घुसून कपाटातील तब्बल अडीच लाखांचा डल्ला मारला. फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक येथील पाटील वस्तीवर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रणाली सुनील शिंगाडे (वय २४) यांनी फिर्याद दिली.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दि. १३ रोजी रात्री ११ ते सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातील ३९ हजार ९८४ रुपयांचे कानातील सोन्याचे झुबे, ६९ हजार ६२० रुपयांचे ४.५४ ग्रॅम वजनाचे पोकळ मणी, ३६ हजार ४३७ रुपये किंमतीचे सोन्याचे ४. ८ ग्रॅम वजनाचे ३ बदाम, ८५ हजार ७१६ रुपये किंमतीची गळ्यातील ९.२६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ३४ हजार २८९ रुपये किंमतीचे सोन्याचे कानवेल असा २ लाख ६३ हजार ४६ रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, वस्तीवरील त्यांच्या शजारी रहाणाऱ्या लीला राजू सूळ यांच्याघरी देखील चोरी झाली.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी भेट देऊन पाहणी केली. तपास हवालदार अमोल चांगण करत आहेत.

0 Comments