वडूज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ दहा दुकाने फोडत दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, July 30, 2018

वडूज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ दहा दुकाने फोडत दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला



दोन बोकडांसह, खाद्य पदाथही पळवले
सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

वडूज: शहरात रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोठा हैदोस घालत दहा दुकानांना लक्ष्य केले. खत दुकानातील एक लाख रूपये साठ हजार रूपयांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारण्याबरोबरच दोन बोकडे व काही खाण्याचे पदार्थही पळविले. तसेच  बहुतांशी दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरीचा प्रयत्न  झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील कराड रस्त्यावर येरळा नदी पात्रालगत असणार्‍या व्यापारी संकुलात दत्तात्रय उर्फ दाजी पाटील (मांडवे) यांचे रत्नाई  ग्रो क्लिनीक हे बी-बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी या लोखंडी कटावणीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दुकानातील साहित्याची  उलथापालथ केली. दुकानात गल्ल्यात असणारी एक लाख  साठ हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.  तसेच दुकानातील चेकबुक, अन्य कागदपत्रेही चोरट्यांनी  लांबविली. दुकानात असणारे सीसी टीव्ही कॅमेरे फोडून ते डीव्हीआरसह लंपास केले. दुकानानजीकच असणारे राहूल खिलारे यांचे आरके डिजीटल दुकानाची लोखंडी कुलुपे उचकटून चोरीचा प्रयत्न  केला. नजीकच्याच अमोल देशमुख यांच्या मोरया जनरल  स्टोअर्स व पान स्टॉल या दुकानाची कुलुपे उचकटून दुकानातील चारशे रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. त्यानंतर प्रकाश खाडे यांच्या श्रीराम टो  गॅरेजचीही कुलुपे उचकटून चोरीचा प्रयत्न केला. 
शरद खाडे यांच्या माळवे हायटेक ग्रो सेंटर या खताच्या दुकानाच्या बाहेर लावलेले सी सी टीव्ही कॅमेरे फोडून  चोरीचा प्रयत्न करण्यात आला. रिलायन्स पंपालगत असणार्‍या विठ्ठल चव्हाण यांचे लहान हॉटेल फोडून आतमधील चारशे रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली. तसेच कराड मर्चंट बँकेचे अध्यक्ष सुरेशराव पवार यांच्या विकास कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तोडफोड चोरट्यांनी केली. तेथून जवळ असणार्‍या विघ्नहर्ता टायर रिमोल्डींग या दुकानाच्या शटरची कुलुपे चोरट्यांनी उचकटली. मात्र आतमध्ये  झोपलेले दुकानातील कामगार जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. कुरोली फाट्यावर बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी शरद औटे यांच्या भवानी कार अ‍ॅक्सेसरीज या दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरट्यांनी शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला.
या चोरीसत्रात चोरट्यांनी मळवी येथील प्रकाश हणमंतराव नांगरे-पाटील यांची पंधरा हजार रूपये किंमतीची दोन  बोकडेही पळविली. रोख रक्कमेवर हात साफ करण्याबरोबरच दोन बोकडे व पान स्टॉलमधील  बिस्कीटचे पुडे व अन्य खाऊचे पदार्थाची पळवापळवीही चोरट्यांनी केली. एकाच रात्रीत दहा ठिकाणी झालेल्या या चोरीत काही  ठिकाणी हे चोरटे सीसी टीव्हीच्या फूटेजमध्ये कैद झाले  आहेत. चोरीच्या या प्रकारामुळे शहरातील व्यापार्‍यांत खळबळ माजली आहे. एकाच रात्रीत अशा प्रकारे सलग  चोरीसत्रात मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता  नागरिकांतून व्यक्त होत आहे. वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून तपास सुरु आहे.

------------

No comments:

Post a Comment