धनगर समाज आंदोलनात शेळ्या-मेंढ्याही - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, July 30, 2018

धनगर समाज आंदोलनात शेळ्या-मेंढ्याही





विक्रम चोरमले/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


फलटण :  धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील तहसीलदार कचेरी समोर धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी दुसर्‍या दिवशी उस्फुर्त प्रतिसादात सुरू होते. या आंदोलनात धनगर समाज बांधव शेळी मेंढयासह मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते. विविध संघटना व पक्षानी या बेंमुदत आंदोलनास पाठिंबा दिला आहे.


सोमवारी सकाळी शिंदेवाडी, तडवळे ग्रामस्थ सस्तेवाडी गावच्या ग्रामस्थांनी तसेच वकील संघटनेनी व मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी युवावर्गासह आंदोलनस्थळी भेट देऊन धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अमलबजावणीच्या मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला. धनगर समाजास आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरु राहणार असल्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला आहे याकडे सरकारने चालढकल केल्यास धनगर समाजास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यास भाग पडलेस पुढील घटनेस सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. फलटण येथे सुरु असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन शांतता व संयमाने सुरु आहे. तरुणांचे भविष्यात होणारे नुकसान टाळून आरक्षणाच्याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा झोपलेल्या शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न विविध आंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात करावा लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शासनाने धनगर आरक्षणाच्या बाबतीत चालढकल केल्यास किंवा धनगर  समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे मंत्रिमंडळातील सदस्य यांना रस्त्यावर फिरु न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे ही समाजाकडून सांगण्यात आले आहे. शासनाने धनगर समाजाची सत्वपरीक्षा पाहू नये अन्यथा शांततेने सुरु असलेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यास त्याची जबाबदारी पूर्णत: शासनावर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ठिय्या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून दुसर्‍या दिवशीच्या आंदोलनास सुरवात करण्यात आली.


महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीची महत्वपूर्ण बैठक दि 30 रविवारी बारामतीच्या बांधकाम विश्रामगृहात पार पडली. महाराष्ट्रातून आरक्षण कृती समितीचे अनेक सदस्य या बैठकीस उपस्थित होते. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय  बारामतीतील बैठकीत घेण्यात आला. धनगर समाज आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. या बैठकीत सर्वच सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पुढील काळात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचे यात ठरविण्यात आले. या आंदोलनात एकसूत्रीपणा असावा या उद्देशाने येत्या रविवारी दि 5 ऑगस्ट रोजी  पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्याचेही निश्चित करण्यात आले. राज्यभरातील सर्व सामाजिक संघटना, विविध पक्षातील समाजाचे नेते व समाजाचे दोन्ही मंत्री, खासदार, आजी माजी आमदार व कृती समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांची व्यापक बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या रविवारपासून धनगर समाज आरक्षणाचा निर्णायक लढा सुरु करणार असून चार वर्षे संयमाने या वेगवेगळ्या घडामोडी पाहत असताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही म्हणून समाजातील तरुणांमध्ये असंतोष पसरत आहे.

No comments:

Post a Comment