कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या बदलीने चर्चेला उधाण - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 15, 2018

कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या बदलीने चर्चेला उधाण




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण : मल्हारपेठ येथील शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी श्रीमुखात भडकावलेले तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांची कोल्हापूर येथे अचानक बदली झाल्याचे वृत्त शुक्रवारी समजताच पाटण तालुक्यात  चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आपण बदलीसाठी मे महिन्यात अर्ज केला होता. त्यामुळे माझी बदली झाली असल्याची माहिती आवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या महिन्यात मल्हारपेठ येथे कृषी विभागाच्या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणी संदर्भात झालेल्या वादावादीत  कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या  श्रीमुखात लगावली होती.या घटनेबद्दल तालुक्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, आवटे यांना मारहान करणार्‍या पाटणकर व त्यांच्या समर्थकांवर शासकीय अधिकार्‍याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला याबद्दल  गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांनी कामबंद  करून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या होत्या. सभापती  विक्रमबाबा पाटणकर यांच्या सह 4 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील पाटणकर हे अद्याप परागंदाच आहेत. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांची अचानक कोल्हापुर या ठिकाणी विभागीय  कृषी सह संचालक  या पदावर नियुक्ती करण्यात आली  आहे.
दरम्यान या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कृषी अधिकारी  आवटे यांची बदली केली कि बदली झाली? या चर्चेला पाटण तालुक्यात उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment