प्रभाकर देशमुखांनी बेंगलोर मध्ये जाऊन जाणून घेतल्या गलाई बांधवांच्या समस्या - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 26, 2018

प्रभाकर देशमुखांनी बेंगलोर मध्ये जाऊन जाणून घेतल्या गलाई बांधवांच्या समस्या


देवापुर / विशाल माने - माण, खटाव, सांगोला, मायणी, खानापूर परिसरातील बेंगलोर स्थित गलाई बांधवांची गणेशोत्सवाचे औचित्य साधून माणदेश फाऊंडेशनचे मार्गदर्शक व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख याना आमंत्रित करण्यात आले होते.  दि.१७ रोजी बेंगलोर येथे त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.  त्यांच्यासोबत माण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीरामभाऊ मानेपाटील, माणदेश फौंडेशनचे माजी अध्यक्ष श्री सुनिलशेठ बाबर, युवा नेते मनोज पोळ, माण तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत हे उपस्थित होते.  यावेळी गलाई बांधवानी उद्योगव्यवसायात येणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचला .या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.



कार्यक्रमात बोलताना देशमुख म्हणाले कि गलाई बांधवाना उद्योग धंद्यात येणाऱ्या अडचणींसंदर्भात मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा .शरद पवार साहेब यांच्याशी बोलून अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.  पाणी फाऊंडेशनच्या कार्यात गलाई बांधवानी दिलेले योगदान कदापिही विसरणार नाही. दुष्काळी भागाचे प्रगती पुस्तक असणाऱ्या गलाई व्यवसायाला स्थिरता मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. गावाला नेहमीच  निरपेक्ष मदत करणारे असंख्य गलाई व्यवसायिक आज मदतीच्या अपेक्षेत आहेत. भारतभर विखुरलेल्या सोने-चांदी व्यावसायिकांवर यांत्रिकीकरणांमुळे आलेली संकटे यामुळे असंख्य गलाई व्यावसायिक आर्थिक मंदीच्या सावटाखाली भीतीच्या छायेत आपले जीवन कंठत आहेत शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा असणारा हा व्यवसाय अनास्थेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे.        परमुलुखात,सातासमुद्रापार  वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या जन्मभूमी ला,माता-पिता,बहीण -भाऊ ,सगे-सोयरे यांना पोरके होऊन  गावासाठी,गावाच्या विकासासाठी  हेच गलाई व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला रीतसर परवाना मिळण्याच्या अपेक्षेत आहेत.त्यांची मागणी रास्त आहे. शाळा,व्यायामशाळा,मंदिरे यासाठी  भरीव आर्थिक  मदत करणारे गलाई व्यावसायिक  अडचणीत आहेत.हे वास्तव आहे.या  व्यवसायिकाना त्यांच्या व्यवसायात स्थिरता देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. दुष्काळी भागाचे प्रगती पुस्तक तपासले व त्यातून गलाई व्यवसाय व गलाईबांधव वजा केले तर केवळ शुन्य उरल्याशिवाय राहणार नाही.  सर्वांना गलाईबांधवांच्या रूणातून कधीच मुक्त होता येणार नाही. गलाई बांधव गावासाठी, आपल्या भागासाठी व आपल्या माणसांसाठी नेहमी झिजत राहीले. गावावर आणि गावातल्या माणसावर भरभरून प्रेम करत राहीले. आयुष्यभर आपली जन्म भूमी ला फक्त वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपली जन्मभूमी,आई वडील,बहीण भाऊ यांना सोडून साता समुद्रापार गलाई व्यवसाय करून या व्यवसायाला एक वेगळी उंची दिली.चोख सोन्यासारखा व पारदर्शीक धंदा करूनही कायम भयभीत होऊन जीवन जगणंच आजवर या असंख्य गलाई व्यवसायिकांच्या वाट्याला आलं .गावातल्या माणसाबद्दलचे प्रेम कधी कमी होवू दिले नाही. चांगल्या कामासाठी कधी हात आखडता घेतला नाही. गलाईबांधवांनी आजवर हेच केले. म्हणूनच गलाईबांधवाच्या व्यवसायाला मान्यताप्राप्त दर्जा द्यावा ही त्यांची मागणी रास्तच आहे. 



कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असणाऱ्या खानापुर, आटपाडी ,माण व खटाव वगैरे तालुक्यात जर गलाई व्यवसाय नसता तर ? ज्यावेळेस असा प्रश्न मनात येतो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. ज्यांनी ही वाट शोधली, ज्यांनी ज्यांनी ती जोपासली त्या सर्वांचेच दुष्काळी भागावर खुप खुप उपकार आहेत. दुष्काळी भागासाठी गलाई व्यवसाय वरदान आहे. गलाई बांधवांचे या भागावर अनंत उपकार आहेत. पिढ्यान-पिढ्या पाणी नसल्याने येथील जमिन उपजावू नाही. कुसळांनी माखलेला गावो-गावचा फोंड्या माळ, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा स्थितीत पर्याय काय ? या पट्ट्यातील माणसांनी जगायचं कसं ? खायचं काय ? मुलंबाळं वाढवायची कशी ? प्यायलाच पाणी नाही, मग शेतीचं काय ? ना कोणी तारणहार ना कोणी त्राता. अशा अवस्थेत गाव सोडून जाण्याशिवाय, मोलमजूरी करून पोटाची खळगी भरण्याशिवाय कोणता पर्याय होता ? गलाई व्यवसाय नसता तर इथल्या आठ-दहा तालुक्यातली गावेच्या गावे ओस पडली असती. ऊस तोडीला गेली असती. आज गावं जाग्यावर आहेत, माणसं माणसात आहेत. दुष्काळ असला तरी लोकांच्या चेहर्यावर आनंदाचे तेज आहे ते गलाई व्यवसाय आणि गलाईबांधव यांच्यामुळेच. प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही म्हणून काय झाले ? पण "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" ही धमक इथल्या लोकांच्यात आहे. जीवनाचा संघर्ष न दमता, न थकता व निराश न होता ही माणसं करत आहेत. विदर्भ मराठवाड्यापेक्षा वाईट अवस्था असतानाही या माणसांनी कधी निराशेचे सुर आळवले नाहीत.  कधी कुणी दारिद्र्याचे, गरीबीचे किंवा कर्जबाजारीपणाचे कारण  पुढे करत जीवनापासून पळ काढला नाही. हे लोक लढत लढत जगत राहीले. अशाच काही जिगरबाज माणसांनी गलाई व्यवसायाची पायवाट शोधून काढली. गलाई व्यवसायाच्या रूपाने सापडलेली पायवाट या जिगरबाज लोकांनी प्रशस्त केली. तिलाच जगण्याचा, जीवन प्रवासाचा महामार्ग बनवले. हाच महामार्ग या आठ-दहा दुष्काळी तालुक्यांचे नशिब बदलणारा ठरला आहे.मराठी माणूस स्वातंत्र्यानंतरच्या काळात झपाट्याने मागे पडला. मात्र ही गलाईव्यवसायातील जिगरबाज माणसं आयपांढरी सोडून हजारो किलोमिटर गेली. तिथे जावून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला. काश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत ही माणसं विखुरली, पसरली. आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर परमुलूखात टिकून राहीली. तिथल्या मातीत, तिथल्या माणसात मिसळून, तिथली संस्कृती आपलीशी करून ही माणसं कष्ट करत राहिली. श्रमावरचा विश्वास बुलंद करत राहिली. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, दुबई सारख्या देशातसुध्दा ही माणसं गेली. तिथे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वत:चे विश्व निर्माण केले.भारताच्या काना-कोपर्यात गेलेल्या, भारताच्या बाहेरही विखुरलेल्या या गलाई बांधवांनी गलाई व्यवसायात आपले पाय घट्ट रोवले. कोईमत्तूर, सेलम, त्रिशुरसह देशभरातल्या काही भागात गलाई व्यवसायीकांनी उभारलेले 'मराठा भवन' पाहीले की अभिमानाने उर भरून येतो. हा व्यवसायच दुष्काळी भागासाठी वरदान ठरला, कामधेनू ठरला.



आज गावोगाव टोलेजंग इमारती आहेत, गावात प्रवेश करतानाच भव्य आणि देखण्या कमानी आहेत. गावोगावच्या शाळांच्या इमारती धष्टपुष्ट आहेत, दोन-तीन मजली शाळांच्या इमारती आहेत. या बांधवांमुळेच गावागावातली मंदीरं भव्य, आखीव, रेखीव, सुबक व आकर्षक आहेत म्हणूनच गलाई बांधवांच्या न्यायमागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देशमुख म्हणाले. ह्या कार्यक्रमाचे नियोजन विजय शितोळे यांनी केले. तर स्वागत उपाध्यक्ष बबन कोडगे यांनी केले. सहकार्य अनिल शिंदे, सुभाष काटकर, विजय जगदाळे, धनंजय  मोरे, सुरेश आनुसे, प्रकाश पुकळे यांनी केले संस्थेचे   सचिव पाडूरंग सांवत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment