बांडगुळांना गुरू कधीपासून मानू लागला : रामराजे - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 4, 2018

बांडगुळांना गुरू कधीपासून मानू लागला : रामराजे

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण : उदयनराजे मला गुरू वगैरे म्हणू लागले आहेत; पण मी कुणाचा गुरू नाही आणि कुणाचा शिष्यही नाही. मला ते मागे बांडगूळ म्हटले होते. बांडगूळ कधीपासून त्यांचा गुरू झाला, असा प्रतिटोला ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी लगावला. दरम्यान, साने गुरुजींनी पुस्तके लिहिल्याचे ऐकले आहे, वाचले आहे. मात्र, त्यांचे पाढे माझ्या तरी वाचनात आले नाहीत. त्यांनी मलाच साने गुरुजींचे पाढे पाठवावेत, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. 


फलटण येथे येऊन खा. उदयनराजेंनी रामराजेंसंदर्भात विधान केल्यानंतर याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर लागलीच रामराजेंनी खा. उदयनराजेंच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज ते मला गुरू म्हणू लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सातार्‍याच्या सर्किट हाऊसवर दहा-पंधरा गाड्या घेऊन कशाला आले होते? बघून घेतो, अशी भाषा कशी काय केली होती? आज अचानक मी गुरू कसा झालो? काही दिवसांपूर्वीच मला ते बांडगूळही म्हटले होते. मग बांडगूळ कधीपासून गुरू झाला? व्हिडीओ पाहिल्यानंतर ते कोणत्या अवस्थेत आहेत ते दिसते आहे. अशा शिष्याची गुरू होण्याची माझी योग्यता नाही. त्यामुळे त्यांनी दुसरा गुरू धुंडाळावा. माझ्या त्यांना शुभेच्छा असतील.


मी त्यांना स्वयंघोषित शत्रू मानलेले नाही. त्यांनीच मला स्वयंघोषित शत्रू मानले आहे. साने गुरुजींनी पुस्तके लिहिलेले मी ऐकले आहे, वाचले आहे. पण साने गुरूजींचे पाढे माझ्या ऐकिवात नाहीत, छत्रपतींनी माझ्या ज्ञानात भर घातली आहे. कुठे साने गुरूजींच्या पाढ्याचे छत्रपतींनी वाचलेले पुस्तक असेल तर त्यांनी मला जरूर द्यावे, बाकी तुम्ही अन्य कोणती पुस्तके वाचता की वाचत नाही याच्या खोलात मला जायचे नाही, असेही ना. रामराजे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment