माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन, शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोपेगाव येथे अंत्यसंस्कार होणार - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, January 17, 2019

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन, शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोपेगाव येथे अंत्यसंस्कार होणार


सातारा : सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
राष्ट्रवादी काँगेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज सकाळी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. स्व.लक्ष्मणराव पाटील यांच्यावर उद्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोपेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव आज गुरुवारी 4 वाजता विकासनगर सातारा येथे निवासस्थानी आणले जाणार आहे.
लक्षमणराव पाटील यांचा जन्म वाई तालुक्यातील बोपेगाव येथील एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात 25 फेब्रुवारी 1938 रोजी झाला होता. लक्षमणराव पाटील यांची राजकीय कारकीर्द स्व. किसन वीर आबा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली होती. बोपेगावच्या सरपंच पदापासून त्यांचा खऱ्या अर्थाने राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर तात्यांनी राजकारणात कधीही मागे वळून पाहिले नाही. तात्यांनी राजकारण, समाजकारण करताना सडेतोड बाणा कधीही सोडला नाही. राजकारणातले त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि पक्षाने किंवा पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे ही होती. किसनवीर आबांनी दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या तात्यांनी चोखपणे पार पाडल्या होत्या. "तात्या" राजकारण करताना मैत्रीला कधीही विसरले नाहीत. माजी खासदार प्रतापराव भोसले आणि लक्षमणराव पाटील यांची मैत्री जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. अलीकडच्या काळात भोसले व पाटील घराण्यात राजकीय विरोध असला तरी "तात्या" आणि "भाऊंच्या" मैत्रीत कधीही राजकारण आले नाही. लक्षमणराव पाटील यांनी मैत्रीला मैत्री आणि विरोधाला विरोध करत जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.लक्षमणराव पाटील हे खा. शरद पवारांचे कट्टर निष्ठावंत मानले जातात. शरद पवार यांनी कॉग्रेस मधून बाहेर पडून १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणारे "तात्या" हे पहिले पदाधिकारी होते. शरद पवार यानीही तात्यांवर विश्वास दाखवत "तात्यांकडे" राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. तात्यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची मजबूत घडी बसवली होती. "तात्या" राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष असताना पक्षाला 1999 च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून 9 आमदार निवडून आले होते. आणि ते स्वतः व श्रीनिवास पाटील खासदार म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटिल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून आमदार करण्याचा तात्यांचा मोठा वाटा होता.
माजी खासदार लक्षमणराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील राजकारणावर नेहमीच वरचष्मा ठेवला होता. म्हणून त्यांनी
१० वर्षे बोपेगाव सरपंच, १० वर्षे वाई पंचायत समिती सभापती, १० वर्षे किसनवीर कारखाना चेअरमन, ११ वर्ष जिल्हापरिषद अध्यक्ष, ४० वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक आणि काही वर्षे अध्यक्ष राहिले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून लक्षमणराव पाटील हे
दोन वेळा निवडून आले होते.

No comments:

Post a Comment