वृद्ध शेतकऱ्यांस पिकाची नोंद करून देण्याच्या बदल्यात पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्या फलटण येथील तलाठी विरोधात गुन्हा दाखल - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, January 30, 2019

वृद्ध शेतकऱ्यांस पिकाची नोंद करून देण्याच्या बदल्यात पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्या फलटण येथील तलाठी विरोधात गुन्हा दाखल

फलटण :- टाकळवाडे ता.फलटण येथील वृद्धास कांदा पिकाची पिकपाहणीला नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्याच्या बदल्यात पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्या टाकळवाडे सजाच्या तलाठी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , सातारा यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अशोक गोटीराम शिर्के, पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादित असे नमूद केले आहे की, तक्रारदार तुळशीराम नारायण फुले, वय वर्ष 58 व्यवसाय शेती, रा. टाकळवाडे पो निंबळक ता. फलटण जि सातारा यांनी दिनांक 14/01/2019 रोजी लाचलुचपत विभाग सातारा यांना दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 14/01/2019 रोजी फलटण येथे लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत व सापळा स्थगित पंचनामा 15/01/2019 रोजी सापळापुर्व व सापळा स्थगित पंचनामा कारवाईवेळी तसेच त्या दरम्यान घडलेल्या घटना, ध्वनीमुद्रीत संभाषण व तक्रारदार यांचा जबाब यावरुन ए.जे.कुदळे यांनी सजा टाकळवाडे ता . फलटण येथील तलाठी या लोकसेवक वर्ग 3 चे पदावर काम करीत असताना आपल्या अधिकाराचा व पदाचा दुरूपयोग करुन स्वतचे आर्थीक फायद्यासाठी तक्रारदार यांचे टाकळवाडे ता फलटण येथील गट ने 91 मधील क्षेत्र 37 आर या क्षेत्रामधील कांदा या पिकाची पिकपाहणीला नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्याच्या मोबदल्यात तलाठी ए.जे.कुदळे यांनी तक्रारदार फुले यांना दिनांक 14/01/2019 रोजी 15:25 ते 17:25 वाजणेचे दरम्यान गजानन चौक फलटण येथील तलाठी काम करीत असलेल्या कार्यालयात पाचशे रुपयाची लाच मागणी करुन भ्रष्ट मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. तलाठी ए.जे.कुदळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 ( दुरुस्ती अधिनियम 2018 ) चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे


काही दिवसांपूर्वीच तलाठी ए.जे.कुदळे हे तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 4 (1)(ब) अनव्ये प्राप्त अधिकारानुसार उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी ए.जे.कुदळे यांना निलंबित केले होते.

No comments:

Post a Comment