सातारा -पुणे हायवेवर वेळे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 1, 2019

सातारा -पुणे हायवेवर वेळे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

वेळे :- सातारा -पुणे हायवेवर वेळे गावच्या हद्दीत बस थांब्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत वेळे गावचेच रहिवाशी असलेले विठ्ठल धोंडिबा ढमाळ (वय 43) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



याबाबत सविस्तर माहिती अशी की, विठ्ठल ढमाळ हे गुरुवारी 31 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान सातारा पुणे हायवेवरून जात होते. त्यावेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार ठोकर दिली व वाहन निघून गेले. ते रस्त्याकडेलाच काही वेळ निपचित पडले होते. या अपघातात त्यांच्या पायाला, छातीला व डोक्याला गंभीर इजा झाली. रात्रीची वेळ असल्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात आले नाही. जखमी अवस्थेत त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने वेळे गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील ते एकटेच आधारस्तंभ होते. सदर घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


याच अपघात ठिकाणी गुरुवारी पहाटे एका भरधाव कारने संरक्षक जाळीला धडक दिली. त्यात कारचे आर्थिक नुकसान झाले व जाळीही उध्वस्त झाली. हाच अपघात जर दिवसा झाला असता तर गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले असते.


वेळे हे अपघात प्रवण क्षेत्र असल्याने येथे दररोज एकतरी छोटा मोठा अपघात होतच असतो. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने येथे उड्डाणपूल बांधला असता तर अनेक गरीब व निष्पाप कुटुंबाचे आधारस्तंभ वाचले असते. येथे घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामानाने येथील हायवेवर अनेक सुविधांची वाणवा आहे. त्यामुळेच अपघातांना आयतेच निमंत्रण मिळते.

दीपक पवार - ग्रामस्थ





No comments:

Post a Comment