१ फेब्रुवारीच्या बंदमध्ये स्वाभिमानी नाभिक संघटना सामिल नाही : अधिकराव चव्हाण - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 1, 2019

१ फेब्रुवारीच्या बंदमध्ये स्वाभिमानी नाभिक संघटना सामिल नाही : अधिकराव चव्हाण

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

पाटण :- स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या आदेशावरून सातारा जिल्ह्यात शुक्रवार १ रोजी कोणत्याही प्रकारचा बंद पाळण्यात येणार नाही अथवा त्या बंदमध्ये स्वाभिमानी नाभिक संघटना सामील नसेल. त्यामुळे सर्वांनी आपापली दुकाने उघडी ठेवावी, असे आवाहन स्वाभिमानी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केले आहे.

  

मंगळवार २२ रोजी कु. भाग्यश्री माने या विद्यार्थीनीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार २३ रोजी स्वाभिमानी नाभिक संघटनेच्यावतीने पाटण तालुका बंद ठेवून कराड येथे वेणूताई रुग्णालयात सात तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कराडचे डीवायएसपी ढवळे, सर्जेराव गायकवाड, ढेबेवाडीचे सपोनि भजनावळे, एलसीबीचे कुंभार या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी ठोस आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेवून भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानुसार दिलेल्या आश्वासनानुसार पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.


स्वाभिमानी नाभिक संघटनेचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष दररोज पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तसेच बुधवार ३० रोजी पोलिसांशी संपर्क साधला असता चार ते पाच दिवसात आरोपी सापडतील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शुक्रवार १  रोजी पुकारण्यात आलेल्या बंदचा स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्ह्याचा काहीही संबंध नाही. तेव्हा सातारा जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधवांनी व सलून व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी शेवटी बोलताना केले आहे.

No comments:

Post a Comment