ग्रंथ, साहित्य संमेलनातून नवकवी व साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ : प्रा. व. वा. बोधे - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, February 2, 2019

ग्रंथ, साहित्य संमेलनातून नवकवी व साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ : प्रा. व. वा. बोधे


पथकथाकार प्रताप गंगावणे यांना मानपत्र देताना विक्रमबाबा पाटणकर, व. वा. बोधे, शंतनू मोघे, प्रदीप कांबळे व इतर. (सुरेश संकपाळ) : फोटो 


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण, दि. 2 : आज सोशल मिडीयाच्या युगात समाजात साहित्याबद्दल कमालिची उदासिनता आहे. मात्र विक्रमबाबा पाटणकरांनी पाटणसारख्या डोंगराळ आणि ग्रामीण भागात ग्रंथ आणि साहित्य संमेलन घेतले ही कौतुकास्पद बाब असून या माध्यमातून पाटण आणि परिसरातील साहित्यिकाना पर्वणीच मिळाली आहे. यातून उद्याच्या साहित्यिकाला एक व्यासपीठ मिळणार आहे. ज्यांच्या नावाने हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे ते भडकबाबा कधीकाळी संयुक्त चळवळीत काम करत होते. तरुण पुढीने साहित्य समेलनाला आवर्जून हजेरी लावावी. पुस्तक विकत घेणारे लोक मला आवडतात. माणसे सर्वकाही विकत घेतात पण पुस्तके विकत घेत नाहीत, अशी खंत ग्रामीण कथाकार प्रा. व. बा. बोधे यांनी व्यक्त केली.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या पुढाकाराने स्व. भडकबाबा पाटणकरनगरीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ व साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची अजरामर भूमिका करणारे अभिनेते शंतनू मोघे, पटकथाकार लेखक प्रताप गंगावणे, भाजपचे प्रवक्ते भरत पाटील, कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, अभिनेते समृद्धी जाधव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष रवींद्र सोनावले, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, शिवसेनेचे तालूकाध्यक्ष सुरेश पाटील, सपोनि उत्तमराव भापकर, अभिनेते संजय पाटील यांची प्रमुख होती.

प्रास्ताविकात विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, आज समाजातील वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. तरुण युवक सोशल मिडीयाच्या आहारी गेला आहे. हे चित्र खऱ्या अर्थाने बदलेले पाहिजे. तालुक्यातील कवी, साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे. पुस्तकाची आवड निर्माण व्हावी. घराघरात ग्रंथ पोहचले पाहिजेत. लेखकांचे विचार तालुक्यातील कवींना ऐकण्यास मिळावे हाच उद्देश घेऊन हे ग्रंथ आणि साहित्य संमेलन आयोजित केले आहे.

ऍड. भरत पाटील म्हणाले, पाटणसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात विक्रमबाबा पाटणकर यांनी आयोजित केलेले साहित्य आणि ग्रंथ संमेलन कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागातील लोकांना साहित्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. राजकारणात गर्दी आणि साहित्यात दर्दी लागतो. पाटण तालुक्यात विविध विभाग आहेत. याठिकाणी विविधतेत एकता पहावयास मिळते.  खऱ्या अर्थाने ग्रंथ हेच आपले गुरू आहेत. मात्र ग्रंथ वाचकांची संख्या कमी होत चालली आहे हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. वाचकांची संख्या वाढली पाहिजे. त्याला वैचारिक प्रगल्भता लाभली पाहिजे. आज इलेक्ट्रॉनिक मिडियापेक्षा प्रिंट मिडीया आघाडीवर आहे. कारण प्रिंट मिडियामुळे अजून वाचन संस्कृती टिकून आहे. पाटण तालुक्यातील वाचन संस्कृती वाढवण्याचे काम या साहित्य आणि ग्रंथ समेलनामुळे होणार आहे.

हिंदुराव पाटील म्हणाले, साहित्य संमेलनातून ज्ञान मिळते. पक्ष विरहित सर्वाना एकत्रित घेवून हे संमेलन घेतले आहे. राजकारणात पूर्वी सुसंस्कृतपणा होता. पैशाच्या बाजारात राजकारणातील सुसंस्कृतपणा नाहीसा झाला आहे. माझा पहिला राजकीय सत्कार भडकबाबानी केला. म्हणून त्यांच्या कार्यक्रमास मी जातीने हजर राहिलो आहे. साहित्य संमेलन हा उपक्रम नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न आहे. या संमेलनातून उद्याची पिढी उज्वल होणार आहे, असे त्यांनी सांगितले

यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांच्या हस्ते पटकथाकार प्रताप गंगावणे यांना मानपत्र देण्यात आले. विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वागत केले.  दादासाहेब कदम, विजय गायकवाड व माने मॅडम यांनी सुत्रसंचालन केले. अभिनेते समृध्दी जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास द्वारकोजीराव पाटणकर, हर्षवर्धन पाटणकर, करणसिंह पाटणकर, दिलीपराव मोटे, उदयसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटणकर, एकनाथ थोरात, फतेसिंह पाटणकर, नितीन पिसाळ, डॉ. रघुनाथ नांगरे,  डॉ. बाबासाहेब सावंत, राजाभाऊ कांबळे, आधार संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते, सौ. आयेशा सय्यद, केळकर, प्रा. सौ. विजया म्हासुर्णेकर, डॉ. विना नांगरे, धनश्री मोरे, विद्या शिंदे, अर्चना देशमुख, आरडे, केळकर, अशोकराव देवकांत, योगेश महाडीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी, वाचक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment