तर विद्यमान खासदार देश सोडून निघून जातील ः नरेंद्र पाटील कराड दक्षिणमध्ये आयोजित मेळाव्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, April 10, 2019

तर विद्यमान खासदार देश सोडून निघून जातील ः नरेंद्र पाटील कराड दक्षिणमध्ये आयोजित मेळाव्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


कराड, दि. 10 (प्रतिनिधी): सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी विद्यमान खासदारांना त्यांनी किती विकासनिधी आणला किती विकासकामे केली याचा प्रश्‍न विचारला पाहिजे. कराड, सातारा येथील एमआयडीसीमध्ये किती नवीन उद्योग सुरु झाले. सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी किती प्रयत्न केले विचारले तर ते देश सोडून निघून जातील, अशी टिका शिवसेना, भाजपा, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांनी केली.
शिवसेना-भाजपा व मित्रपक्ष महायुतीच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमध्ये आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण मतदारसंघातील वारूंजी, कोळे, उंडाळे, रेठरे बुद्रुक, सैदापूर या जिल्हा परिषद गटांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उमेदवार  पाटील यांच्यासह राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, विकास आणि रोजगार निर्मिती ही दोनच उद्दीष्टे ठेउन निवडणुकीस सामोरे जात आहे. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर मुंबईत शिवसैनिक माथाडी कामगारांच्या पाठीशी ठाम राहिले. कराड तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचे आश्‍वासन अतुल भोसले यांनी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये प्रवास करुन तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केले. सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी विद्यमान खासदारांना त्यांनी किती विकासनिधी आणला किती विकासकामे केली याचा प्रश्‍न विचारला पाहिजे. कराड, सातारा येथील एमआयडीसीमध्ये किती नवीन उद्योग सुरु झाले. सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी किती प्रयत्न केले विचारले तर ते देश सोडून निघून जातील. या प्रश्‍नांची त्यांच्याकडे उत्तरेच नाहीत. कामेच नाहीत तर कामांची यादी काय सादर करणार. न्यूज चॅनेलवर प्रश्‍न विचारण्यात आला त्यावेळी खासदार काहीही उत्तर देउच शकले नाहीत. सातारा जिल्ह्यातील विकासकामांबाबत प्रश्‍न विचारला असता उदयनराजे आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांवर बोलू लागतात. दुष्काळाच्या समस्येबाबत त्यांचे काहीही काम नाही. उस उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्‍नांबाबत लोकसभेत कधीही बोलले नाहीत.   अनेक लोक आपण यांना पाहिलंत का असा बॅनर लावण्याचा विचार बोलून दाखवत आहेत. ते पाच पाच वर्षे मतदारांना तोंडही दाखवत नाहीत. पंचवीस कोटींचा खासदार निधी नियोजन करुन प्रत्येक तालुक्याला 2 ते 3 कोटी तरी सहज देता आला असता. मुख्यमंत्र्यांना भेटून अतिरिक्तही मागता आला असता. कराड ते चिपळूण रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करु. 
 डॉ. अतुल भोसले म्हणाले, मोदी सरकारच्या कणखर नेतृत्वामुळे भारतीय जवानांनी बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. देशाच्या सुरक्षेसाठी झालेला हा महत्वाचा सर्जिकल स्ट्राईक संपूर्ण जगाने मान्य केला असतानाही, त्याबाबत पुरावा मागणारे आणि पाकिस्तानची भाषा बोलणारे काँग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे खर्या अर्थाने देशद्रोही आहेत. देशाच्या संरक्षणाची आणि सार्वभौमत्वाची काळजी असणार्या शिवसेना-भाजपा युतीला निवडून देणार की देशाच्या कामगिरीवर शंका घेणार्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला निवडून देणार? असा सवाल उपस्थित करत ना. डॉ. भोसले यांनी आघाडीच्या देशद्रोही भूमिकेवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम केले. मराठा आरक्षण देण्याचे ऐतिहासिक धोरण याच राज्यसरकारच्या माध्यमातून झाले. या निवडणुकीसाठी विरोधक एकवटले आहे. ज्या माजी मुख्यमंत्र्यांना मराठवाडी धरणाचा प्रश्न सोडविता आला नाही, ते मात्र राफेलवर गप्पा मारत आहेत. काँग्रेसने तर देशद्रोहाचे कलम वगळणार असल्याचे आपल्या जाहीरनाम्यातच म्हटले आहे. त्यामुळे अशा देशद्रोही वृत्तीच्या आघाडीला हद्दपार करून, विकासाची दृष्टी असणार्या शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
 ना. शेखर चरेगावकर म्हणाले, काँग्रेस-राष्ठ्रवादीच्या नेत्यांनी विकासाच्या वल्गना करत जनतेची दिशाभूल केलेली आहे. विद्यमान खासदार हे आपल्या विचारांचे नाहीत, तरीही भाजपा सरकारने सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी साडेअकरा हजार कोटी रूपयांचा निधी दिला आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असून, देशात नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सातारा मतदारसंघातून नरेंद्र पाटील यांना विजयी करा.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितिन काशीद, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, जि.प. सदस्या सौ. शामबाला घोडके, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, निवासराव थोरात, माजी संचालक श्रीरंग देसाई, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मोहनराव जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पैलवान धनाजी पाटील, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, भीमराव कळंत्रे, रामभाऊ रैनाक, दाजी जमाले, रमेश लवटे, सुदर्शन पाटसकर, नितीन पवार, प्रमोद पाटील, भूषण जगताप, पंकज पाटील, संजय शेटे, सुनील जाधव, हरीभाऊ शेवाळे, व्ही. के. मोहिते, शिवाजीराव दमामे, नारायण शिंगाडे, अरूण सावंत, महेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment