उदयनराजेंचे टार्गेट मोदी...नरेंद्र पाटलांचे टार्गेट उदयनराजे! - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, April 10, 2019

उदयनराजेंचे टार्गेट मोदी...नरेंद्र पाटलांचे टार्गेट उदयनराजे!


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................................
सातारा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अत्त्युच्च पातळी गाठू लागली आहे. मतदानाला अवघे 13 दिवस उरले असून सातारा लोकसभेतील एकंदरीत परिस्थिती पाहता उदयनराजेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला टार्गेट केले जात आहे तर पहिल्यांदाच आखाड्यात उतरलेल्या नरेंद्र पाटलांनी स्थानिक मुद्द्यांवरून थेट उदयनराजेंनाच टार्गेट केले आहे.
गेली दहा वर्षे उदयनराजे सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यंदा ते हॅट्ट्रीक करण्याच्या वाटेवर आहेत. 2009, 2014 च्या निवडणुकीत उदयनराजे विक्रमी मतांनी निवडून आले. त्यांच्यासमोर असलेले प्रतिस्पर्धी पुरुषोत्तम जाधव तेवढे तगडे नसले तरी त्यांनी चांगली झुंज दिली. दहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. आता राष्ट्रवादी टू शिवसेना व्हाया भाजप असा प्रवेश करणारे नरेंद्र अण्णासाहेब पाटील उदयनराजेंच्या विरोधात उतरले आहेत. नरेंद्र पाटलांमुळे सगळ्या मतदारसंघात जवळपास उदयनराजेंना ही निवडणूक एकतर्फी नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
प्रचाराची भिरकीट दोन्ही बाजूंकडून सुरु असल्याचे दिसून येत असून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले, बंधू व राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्यासह पवारा साहेबांच्या शब्दावर सज्ज झालेली राष्ट्रवादीची अख्खी फौज राष्ट्रवादीच्या प्रचारात आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंचे बंधू त्यांच्यासोबत असताना विरोधी उमेदवार नरेंद्र पाटील यांचे सख्खे बंधू जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील हे राष्ट्रवादीसोबत आहेत.
मोदी सरकार टार्गेट
गेल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात उदयनराजेंनी काय केले हे नव्याने सांगण्याची गरज नसल्याने प्रचाराच्या सुरुवातीच्या काळापासून उदयनराजेंनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला टार्गेट केले आहे.
 परिवर्तन झाले नाही तर इंडियाचा सोमालिया होईल, असे सांगतानाच नरेंद्र पाटलांवरही त्यांनी ‘यात्रे’पुरतेच येतात, अशी टीका सातत्याने केलेली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी नरेंद्र पाटलांवर टीका केलेली नसून त्यांच्याकडे टिकेचे बहूतेक मुद्दे नसल्याचे जाणवत आहे.
पाटलांच्या प्रचारात भाजप
दुसरीकडे नरेंद्र पाटील जरी शिवसेनेत असले तरी ते भाजपचेच प्रतिनिधी असल्याचे सर्वश्रूत आहे. कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ‘मी नरेंद्र पाटलांना मागून घेतले’, असे सांगितले होतेच. जिल्ह्यातील संघाच्या स्वयंसेवकांपासून अलीकडच्या काळात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात चांगलीच घुसखोरी केलेल्या भाजपने सातारा मतदारसंघात चांगलाच जोर लावल्याचे दिसत आहे. पाटील भाजपचाच उमेदवार असल्याचे मानून भाजप कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरले आहेत.
शिवसेनेनेही जोर लावला असून उशिरा का होईना रिपाइंही आता प्रचारात उतरली आहे. दुसरीकडे त्यांच्या मातोश्रींनी केलेले भावनिक आवाहन आणि पत्नी डॉ. प्राची पाटील यांनीही प्रचारात कोणतीही कसर ठेवलेली नाही. वाड्या-वस्त्या त्यांनी पिंजून काढल्या आहेत.
टार्गेट उदयनराजे
नरेंद्र पाटील हे लोकसभेसाठी नवखे असले तरी विधानपरिषदेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी चांगलाच संपर्क वाढवला होता. प्रचारात त्यांनी ‘उदयनराजे’नाच मेन टार्गेट ठेवले आहे. त्यांच्या दहशतीपासून, कॉलर उडवणे, गाणी म्हणणे आणि स्थानिक विकास निधीचा न केलेला वापर आदी मुद्द्यांवर भर दिला आहे.
एकंदरीत प्रचाराची राळ चांगलीच उडाल्याची दिसत असून एकाच दिवशी सर्व वृत्तवाहिन्यांवर खासदार उदयनराजेंच्या मुलाखती झळकल्याने या मुलाखतीच्या क्लिप्स मतदारसंघात चांगल्याच व्हायरल झाल्या. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी जोमात असल्याचे दिसत असली तरी नरेंद्र पाटीलही उद्या जायंट किलर ठरू शकतात, असा विश्‍वास भाजप कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. सातारा मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार असून  सार्‍या राज्याचे लक्ष आहे.

No comments:

Post a Comment