युती तालुक्याच्या स्वाभिमानासाठी डॉ. दिलीपराव येळगावकर-प्रभाकर घार्गे यांचे वडूजच्या सभेत संयुक्त प्रतिपादन - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, June 15, 2019

युती तालुक्याच्या स्वाभिमानासाठी डॉ. दिलीपराव येळगावकर-प्रभाकर घार्गे यांचे वडूजच्या सभेत संयुक्त प्रतिपादन


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
येरळवाडी :
खटाव तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते व जनतेचा स्वाभिमान तसेच तालुक्यातील राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठीच वडूजच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या नगरसेवकांनी युती केली आहे. असे ठोस प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे व डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनी संयुक्तरित्या केले आहे.
वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील गोडसे व उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या किशोरी पाटील यांची निवड झाल्यानंतर बाजार पटांगण मैदानात झालेल्या विजयी सभेत ते बोलत होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विकल्प  शहा, जेष्ठ नेते हिंदुराव गोडसे, शिवाजीराव गोडसे, किसनराव गोडसे, हिंदुराव शंकर गोडसे, सचिनशेठ माळी, विपुल गोडसे, संदीप गोडसे, वचनशेठ शहा, महेश गोडसे, विजय शेटे, राजेंद्र चव्हाण, श्रीकांत राऊत, आप्पासाहेब गोडसे, जयवंत पाटील, मगर, शोभा माळी, सुनिता कुंभार, सुवर्णा चव्हाण, काजल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाकर घार्गे म्हणाले, खटाव तालुका ही हुतात्म्यांची भूमी आहे. दुसर्‍या तालुक्यातील नेतृत्वाच्या अतिक्रमणामुळे युवा पिढीला चुकीचे वळण लागत आहे. हे रोखण्यासाठी आपण भाजपाबरोबर युती करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. आपल्या दृष्टीने विकास कामे ही महत्वाची बाब आहे. वडूजमध्ये नियोजन समितीच्या सदस्या सौ. शोभा माळी व राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठी विकासकामे व्हावीत.
आ. गोरे दुटप्पी : डॉ. येळगांवकर
आ. जयकुमार गोरे यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार केला. मात्र अद्याप त्यांनी पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला नाही.
स्थानिक परस्थिती व नगरसेवकांची मते आजमावून न घाता वरिष्ठ पातळीवरील दबाव टाकून ते शहरातील भाजपाच्या कार्यकत्यांचे खच्चीकरण करु पाहात होते.
मात्र सुज्ञ नगरसेवक व प्रमुख कार्यकत्यांनी जबाबदारीने विचार विनीमय करुन राष्ट्रवादीशी युती केली.
ही सर्व प्रक्रिया एकमेकांच्या विश्‍वासातून पार पडली आहे. याकामी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रावसाहेब मगर तसेच पुसेसावळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार यांची शिष्टाईही यशस्वी ठरल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
एका बाजूला वैयक्तिक कामासाठी भाजपाचा संपर्क वाढविणे व दुसर्‍या बाजूला काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहून प्रतोदपद स्वीकारणारे आ. गोरे हे दुटप्पी वागत आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी भाषणात केला.
नगरसेवक अभय देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. आप्पासाहेब गोडसे यांनी आभार मानले.
 सिक्सर ऐवजी चौकार
नगरपंचायतीत भाजपाकडे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे अंतिम चेंडू भाजपाच्या हाती होता. विरोधकांना कोंडीत पकडून नगराध्यक्ष पद पटकावून सिक्सर मारण्याची संधी होती. मात्र या खेळीत कॅचआऊट होण्याचा मोठा धोका होता. तो धोका टाळत चाणाक्ष नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी उपनगराध्यक्ष पद पदरात घेवून चौकार ठोकल्याचे समाधान मानल्याची चर्चा शहरात आहे.

No comments:

Post a Comment