अवैध धंदे मोडण्याचे आव्हान, पांचगणीत नव्या कारभार्‍यांची कसोटी, सोनवणेंच्या बदलीने नागरिक समाधानी - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, June 21, 2019

अवैध धंदे मोडण्याचे आव्हान, पांचगणीत नव्या कारभार्‍यांची कसोटी, सोनवणेंच्या बदलीने नागरिक समाधानी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
......................................
महाबळेश्‍वर : पांचगणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांची बदली झाल्याने त्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या तेथील अनेक जेष्ठ नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण, सोनावणे यांच्या काळात लॅण्ड माफियांच्या गुंडांनी मोठी दहशत निर्माण केली होती तर मटका धंदयाला पुन्हा सुगीचे दिवस आले होते. वाहतुकीची कोंडी सोडविण्या बाबतही सोनावणे या उदासीन होत्या. पांचगणी पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान नव्याने येणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक बडवे यांच्या समोर असणार आहे.
राज्यातील नावाजलेले एक शैक्षणिक केंद्र म्हणून पांचगणी या पर्यटन स्थळाची ओळख आहे. देश -विदेशातील मुलांबरोबरच अनेक उदयोगपतींची व सिने तारे तारकांची मुले येथे प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवतात। महाबळेश्‍वरपेक्षा या थंड हवेच्या ठिकाणची हवा अधिक अल्हाददायक असल्याने ब्रिटीश काळापासून अनेक उदयोगपतींचे येथे बंगले आहेत. येथील जमिनीला सोन्याचा भाव असल्याने अनेक धनिकांच्या वारसांमध्ये या मिळकतींचे वाद सुरू झाले आहेत. मिळकतीचा ताबा असलेले मिळकती सोडण्यास तयार होत नाही. यामध्ये अनेक वर्षानुवर्षे रहात असलेले भाडेकरू यांचाही समावेश आहे. यातूनच मिळकतीचा ताबा मिळविण्यासाठी धनिकांनी येथे बळाचा वापर सुरू केला तर काही धनिकांनी लॅण्ड माफियांची मदत घेण्यास सुरूवात केली. लॅण्ड माफियांच्या विरोधात पांचगणी पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल आहेत. मागील आठवडयात असाच एक प्रकार पांचगणीमध्ये घडला. रेशमी चौकात असलेल्या एक बंगला ताब्यात घेण्यासाठी वाई येथील लॅण्ड माफियांनी बंगल्या भोवती फिल्डींग लावली. काही पुरूष व काही स्त्रियांंची नेमणूक करण्यात आली. येथे मोठे वाद होणार याची कल्पना आल्याने बंगल्यातील महिलांनी  पोलीस ठाण्यात माहीती दिली. परंतु, नेहमीप्रमाणे पोलिसांनी दुर्लक्ष केले. दोन ते तीन दिवसांनी लॅण्ड माफियांनी बंगल्यातून महीलांना व  नंतर बंगल्यातील नोकरास मारहाण करून तेथील त्यांचे साहित्य बाहेर फेकून बंगल्याची बेकायदेशीर ताबा घेतला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर पोलिसांनी या प्रकणाची फारसी दखल घेतली नाही. ज्यांनी बळाचा वापर केला त्यांचेवर किरकोळ गुन्हे दाखल करण्यात आले. त्या मुळे पांचगणी पोलिसांची प्रतिमा डागाळलेली आहे.
शहरात काही वर्षापुवी मटका बंद होता. परंतु, सोनावणे येताच  मटका पुन्हा ओपन झाला. यासाठी मटका व्यवसायिकांकडून हप्ता डबल करण्यात आला होता.  शहरात वाहतुकीची कोंडीची समस्या कायम डोके वर काढते. परंतु, ही वाहतुकीची कोंडी सोडविण्याकडे सोनावणे यांनी कायम दुर्लक्ष केले होते. या कारभारामुळे  सर्वसमान्य नागरिकां प्रमाणेच येथील जेष्ठ नागरीकांमध्ये तीव्र नाराजी होती.  आता सोनवणेंच्या जागी येत असलेले  बडवे यांच्या पुढे लॅण्ड माफियांची दहशत मोडून काढण्याबरोबरच मटका व इतर धंदे उध्वस्त करण्याचे आव्हान असणार आहे.

No comments:

Post a Comment