शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 26, 2024

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कामेरी:
कामेरी, ता. सातारा येथील हुतात्मा वीर जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर आज   कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू कश्मीर मधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ  बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान हुतात्मा झाले होते. त्यामध्ये 11 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये देशसेवा करणार्‍या कामेरी गावचे सुपूत्र   शुभम समाधान घाडगे (वय 28) यांचा समावेश होता.
शुभमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे झाले होते. माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी काँलेज सातारा येथे होऊन पुढे तो लष्करात भरती झाला. त्यांच्या जाण्याने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपूत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले आहे. शुभमच्या मागे  आई- वडील, पत्नी, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.
गुरुवारी हुतात्मा जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
 शुभम घाडगे यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.  
भावाने दिला मुखाग्नी
पोलीस व सैन्य दलाच्या  जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी अर्चना, मुलगी साईशा, आई मनिषा, वडील समाधान व भाऊ संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन  घेतल्यानंतर भाऊ संजय यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी  लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि  ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment