सातारा (सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क)
वाई येथील जनता अर्बन को-ऑप. बँक लि.मध्ये संचालकांच्या राजीनाम्यांमुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणींच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७७अ अंतर्गत हा आदेश काढण्यात आला असून सहाय्यक निबंधक प्रिती काळे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश जारी केला. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २८ ऑक्टोबर २०२२ रोजी झाली होती. एकूण ११ संचालक पदांपैकी ८ संचालक निवडून आले होते, तर ३ पदे रिक्त राहिली होती. त्यानंतर मंडळ गठीत करण्यात आले होते.
दरम्यान, ६ एप्रिल २०२६ रोजी शेखर हणमंत फरांदे, महेंद्र नामदेव जमदाडे, निळकंठ मधुकर मोरे व रमेश रामचंद्र बुलुंगे या चार संचालकांनी राजीनामे दिले. या राजीनाम्यांमुळे संचालकांची संख्या कमी होऊन बँकेच्या कामकाजासाठी आवश्यक कोरम पूर्ण होणे अशक्य झाले. बँकेच्या उपविधीनुसार संचालक मंडळासाठी किमान ५० टक्के उपस्थिती आवश्यक असताना ती उपलब्ध राहिली नाही.
बँकेकडून काही संचालकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कायदेशीर तरतुदींनुसार निवडून आलेल्या संचालकांची संख्या अपुरी असल्याने मंडळाची वैधता टिकवता आली नाही. परिणामी बँकेच्या व्यवस्थापनात पोकळी निर्माण झाल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. प्रिती काळे यांनी तात्काळ पदभार स्वीकारून बँकेचे कामकाज हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अधिनियमातील कलम ७७अ (२) व ७७अ (३) नुसार बँकेचे दैनंदिन कामकाज पाहणे व ठराविक मुदतीत नवीन निवडणुका घेण्याची प्रक्रिया राबवणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे बँकेच्या कामकाजात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, संचालक मंडळातील घडामोडींमुळे वाईच्या सहकार क्षेत्रात चर्चांना उधाण आले असून सभासदांचे लक्ष आता आगामी निवडणुकांकडे लागले आहे.

0 Comments