बनावट पोलीस अधिकारी आणि सरकारी कागदपत्रांचा वापर
कराड | सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कायदेशीर कारवाई आणि अटकेची भीती दाखवून सायबर भामट्यांनी कराडमधील ७४ वर्षीय निवृत्त शिक्षिकेला तब्बल २ कोटी ३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला. पोलिसांचा गणवेश परिधान करून व्हिडीओ कॉल करणाऱ्या संशयिताने दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर तपासाच्या नावाखाली बँकांतील ठेवी, गुंतवणूक आणि विमा पॉलिसीवर कर्ज काढून रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले. सरकारी यंत्रणांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ओगलेवाडी रस्त्यावरील पूर्व गजानन हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या या वृद्धेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत २९ वर्षे शिक्षिका म्हणून सेवा बजावली असून, २००७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पतीच्या निधनानंतर त्या घरी एकट्याच राहतात. आयुष्यभराची बचत, निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम आणि विविध गुंतवणुकींच्या माध्यमातून त्यांनी भविष्याची आर्थिक तरतूद केली होती. मात्र, सायबर भामट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची ही पुंजी लुटली.
चार राज्यांतील बँक खात्यांचा बनाव
३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वृद्धेला एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल आला. पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या या व्यक्तीने स्वतःची ओळख संदीप राव अशी करून दिली. वृद्धेच्या नावावर चार राज्यांत बँक खाती उघडण्यात आली असून, कॅनरा बँकेतील एका खात्यातून अडीच कोटी रुपये दहशतवाद्यांना पुरवले जात असल्याचा दावा त्याने केला. या प्रकरणात त्यांना अटक होऊ शकते, अशी धमकीही दिली.
बदनामी आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीने वृद्धा घाबरल्या. संशयिताने कोणालाही या प्रकाराची माहिती देऊ नये, अशी ताकीद दिली. त्यांचे दूरध्वनी संभाषण तपासले जात असल्याचे सांगून दर दोन तासांनी त्या घरी सुरक्षित असल्याचा संदेश पाठवण्यास सांगितले. संशयिताच्या सूचनेनुसार त्या घरातील स्वतःचे छायाचित्रही पाठवत होत्या.
ठेवी मोडून सव्वा कोटींहून अधिक रक्कम पाठवली
वृद्धेचा विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने बँकांतील सर्व रक्कम तपासणीसाठी पाठवण्यास सांगितले. ही रक्कम परत मिळेल, असे आश्वासन दिल्याने त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी आयसीआयसीआय बँकेतील बचत खाते, आवर्ती ठेव आणि मुदत ठेवी मोडल्या. त्यातून मिळालेले १ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये त्यांनी आरटीजीएसद्वारे संशयिताने सांगितलेल्या खात्यावर वर्ग केले.
यानंतर संशयिताने अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाने बनावट पावती तयार करून व्हॉट्सॲपवर पाठवली. या पावतीवर सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आणि क्यूआर संकेतचिन्हही होते. त्यामुळे पैसे अधिकृत तपासणीसाठी जमा झाल्याचा वृद्धेचा समज झाला.
पोस्टातील गुंतवणूक आणि विमा पॉलिसीवरही कर्ज
७ ऑक्टोबर रोजी संशयिताने पुन्हा संपर्क साधून दुसऱ्या बँकेतील आणि पोस्टातील गुंतवणूक काढण्यास सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या नावाने तपासणीनंतर पैसे परत देण्याचे आश्वासन देणारे कथित हमीपत्रही पाठवण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून वृद्धेने आणखी ४९ लाख रुपये संशयिताने सांगितलेल्या खात्यावर पाठवले.
८ ऑक्टोबर रोजी संशयिताने एलआयसीमधील गुंतवणुकीची रक्कम पाठवण्याची मागणी केली. मुदतपूर्व पैसे मिळणार नसल्याचे वृद्धेने सांगितल्यानंतर त्यांना विमा पॉलिसीवर कर्ज काढण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी आणखी नऊ लाख रुपये अन्य खात्यावर वर्ग केले.
अशा प्रकारे तीन टप्प्यांत वृद्धेकडून एकूण २ कोटी ३ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले.
बनावट पोलीस प्रमाणपत्र पाठवूनही फसवणूक सुरूच
पैसे परत मिळत नसल्याने वृद्धेने संशयिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. १० ऑक्टोबर रोजी त्यांना व्हॉट्सॲपवर कथित पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र पाठवण्यात आले. पीएफआय आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात चौकशी होऊन त्या निर्दोष आढळल्याचा मजकूर त्यावर होता. नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या तपासाचाही उल्लेख करण्यात आला होता.
१२ ऑक्टोबर रोजी पुन्हा संपर्क साधूनही पैसे परत मिळाले नाहीत. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धेने १३ ऑक्टोबर रोजी सुनेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार करण्यात आली.
या प्रकरणी संशयित संदीप राव याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मोबाइल क्रमांक, बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे
पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगून व्हिडीओ कॉलवर अटकेची भीती दाखवणे, पैसे तपासणीसाठी पाठवण्यास सांगणे अथवा कोणालाही माहिती देऊ नये, अशी सक्ती करणे ही सायबर फसवणुकीची गंभीर लक्षणे आहेत. अशा वेळी घाबरून पैसे हस्तांतरित न करता संबंधित यंत्रणेशी अधिकृत माध्यमातून संपर्क साधावा. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी.


0 Comments