गंठण-राणीहार पाहण्याच्या बहाण्याने भरदिवसा चोरी; १० लाखांचे दागिने आणि स्प्लेंडर दुचाकी पोलिसांकडून जप्त
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी, ता. पाटण : सराफ दुकानात दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या दोघांना ढेबेवाडी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली. ढेबेवाडी-सणबूर रस्त्यावरील बाजारपेठेत १६ ऑक्टोबर रोजी भरदिवसा घडलेल्या या चोरीचा छडा लावत पोलिसांनी सुमारे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर दुचाकी जप्त केली.
दागिने पाहण्याचा बहाणा अन् क्षणात पोबारा
ढेबेवाडी-मंद्रुळकोळे येथील मगर बंधू ज्वेलर्समध्ये दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. दोन संशयित दुकानात आले आणि गंठण व राणीहार खरेदी करायचा असल्याचे सांगितले. दुकानदार विनोद मगर यांनी त्यांना वेगवेगळ्या डिझाइनचे दागिने दाखवण्यास सुरुवात केली. दागिने पाहण्याच्या बहाण्याने एका संशयिताने हातात घेतलेले सोन्याचे दागिने दुकानदाराचे लक्ष नसल्याची संधी साधून लंपास केले आणि दुकानातून पळ काढला.
दुकानाबाहेर ढेबेवाडी चौकात दुचाकी घेऊन साथीदार थांबला होता. दोघेही दागिन्यांसह दुचाकीवरून दिवशी घाटमार्गे नवारस्ता परिसराच्या दिशेने पसार झाले.
तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध
घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सराफ दुकानदार विनोद मगर यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढला. गुन्हा दाखल झाल्यापासून ४८ तासांच्या आत दोघांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी अमित भीमराव पाटील (वय ३९, रा. आणे, ता. कराड) आणि रोहित नामदेव घाडगे (वय ३७, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कराड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे १० लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली.
ढेबेवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार आणि पाटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच सातारा सायबर पोलीस ठाण्याने तपासात सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण करीत आहेत.

0 Comments