Hot Posts

6/recent/ticker-posts

येणपे फाट्यावर सशस्त्र चोरी; ५० लाखांचे दागिने लंपास

 

कराड-चांदोली मार्गावरील येणपे फाटा (ता. कराड) येथे  रात्री दोन  चोरट्यांनी घरात एकट्या असलेल्या ६५ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून सुमारे ५० लाखांचा ऐवज लुटला. इंदुमती तानाजी जाधव यांच्या अंगावरील व कपाटातील साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. घटनेला २४ तास उलटूनही चोरट्यांचा मागमूस लागलेला नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
जाधव यांची दोन्ही मुले सैन्यदलात कार्यरत असून, नोकरीनिमित्त बाहेर असल्याने त्या घरी एकट्याच होत्या. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास उंडाळे येथील कार्यक्रमावरून त्या घरी परतल्या. रात्री साडेआठच्या सुमारास अचानक वीज गेली. त्यानंतर मास्क लावलेले दोन चोरटे घरात घुसले. त्यातील एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसऱ्याने तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर कपाटाच्या चाव्या घेऊन आतील दागिने व रोख रक्कम लुटली.
चोरी करून बाहेर पडताना चोरट्यांनी घराला बाहेरून कडी लावली. हातमोजे वापरून तसेच हात लागलेल्या ठिकाणच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न करून ते पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळाने सावरल्यानंतर जाधव यांनी मुलांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आईसाठी तीन महिन्यांपूर्वीच दागिने खरेदी केले होते. गावी आल्यानंतर ते बँकच्या सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्याचा विचार होता.
पोलिसांनी चोरट्यांचा लवकर शोध घेऊन दागिने परत मिळवून द्यावेत,अशी अपेक्षा जाधव यांच्या मुलाने व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेनंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली दोन ते तीन स्वतंत्र पथके संशयितांच्या शोधासाठी स्वाना झाली आहेत. मात्र असे असले तरी शनिवारी सायंकाळपर्यंत संशयितांचा माग पोलिसांना लागला नव्हता. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामीण विभागात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments