पोलीस दलातील ‘पाटील’की संपली... आता ‘देशमुखी’ पंकज देशमुख सातार्‍याचे नवे एसपी, पाटलांच्या बदलीने सातारकर अस्वस्थ - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, July 28, 2018

पोलीस दलातील ‘पाटील’की संपली... आता ‘देशमुखी’ पंकज देशमुख सातार्‍याचे नवे एसपी, पाटलांच्या बदलीने सातारकर अस्वस्थ



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा : मोक्कासारखे प्रभावी अस्त्र वापरून गुंडांचे कंबरडे मोडणारे आणि आपल्या कारकिर्दीत अल्पावधीत लोकप्रिय झालेले पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शुक्रवारी बदली झाली. उस्मानाबदचे अधीक्षक पंकज देशमुख यांची नवे एसपी म्हणून नियुक्ती झाली आहे. पोलीस खात्यातील पाटीलकी संपून देशमुखी सुरु होणार असताना पाटील यांच्या बदलीने सातारकर पुरते अस्वस्थ झाले. पाटील यांना एक वर्षे मुदतवाढ मिळावी यासाठी सातारकर एकवटले असून सोशल मीडियावर दिवसभर समर्थन फॉर पाटील ही मोहिम सुरु होती.


राज्यातील 95 उच्चस्तरीय पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आला. या बदल्याअंतर्गत सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. दोन वर्षांच्या सातार्‍यातील कालावधीत त्यांनी संघटीत गुन्हेगारी (मोक्का) व तडीपारी अंतर्गत जिल्यातील गुन्हेगारीचा अक्षरशः बिमोड केला. यामुळे सातारा पोलिसांची गुंडावर दहशत बसवणारे व नावातच एसपी असणारे डॅशिंग संदीप पाटील अशी त्यांची जिल्हावासीयांना अजरामर ओळख राहणार आहे. याबरोबरच देशातील पहिले स्मार्ट सातारा पोलिस दलफ करण्याची किमयाही त्यांनी करून दाखवली आहे. दरम्यान, एसपी संदीप पाटील यांना आणखी एक वर्षाचा कालावधी वाढवून मिळावा, अशी सोशल मीडियातुन सातारा जिल्हावासियांची मागणी जोर धरू लागली आहे.


एसपी संदीप पाटील यांनी जून 2016 मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार घेतला. त्याअगोदर ते संवेदनशील असणार्‍या गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक होते. गडचिरोलीतून सातार्‍यात हजर होत असताना त्यांनी बुके नको बुक आणा असे सातारकरांना आवाहन केले आणि जिल्हावासियांनीही त्यांची एक पुस्तक देऊन भेट घेतली. जमा झालेली ही सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील नागरिकांना वाचण्यासाठी पाठवून एक नवा पायंडा घातला. अशा पद्धतीने त्यांनी पुस्तकप्रेमी म्हणून आगमन केले आणि दोन वर्षाच्या कालावधीत सातारा शहरासह जिल्ह्यातील सावकारी, खंडणीखोर, गुंडगिरी, पर्यटनस्थळी लुटणारी टोळी या गुन्हेगारीचा अक्षरशः बिमोड केला.


एसपी संदीप पाटील यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे नामचीन गुंडापासून गल्लीबोळातील हुल्लडबाजापर्यंत भले भले दबकून होते. थोडी जर गडबड झाली की मोक्का लागणार किंवा तडीपार होणार अशी पोलिसांची गुन्हेगारांवर दहशत निर्माण झाली होती. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच सातारा जिल्ह्यातील क्राईमरेट कमी झाला. एसपी संदीप पाटील यांच्या या ठोस कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.सातारकरांची शनिवार सकाळ मात्र एसपी संदीप पाटील यांची बदली झाल्याच्या वृत्ताने उजाडली आणि अनेकांचा हिरमोड झाला. सोशल मीडियावर तर एसपी संदीप पाटील यांची बदली रद्द व्हावी अशी मागणी दिवसभर होत होती.सातार्‍यात काम करायला मिळणार हे भाग्य सातारा ही छत्रपतींची राजधानी असून सातार्‍यात काम करायला मिळेल हे माझे भाग्य समजतो. संदीप पाटील यांची कमतरता जिल्हावासियांना भासू देणार नाही. आपल्याकडून जिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देऊ, अशी प्रतिक्रिया पंकज देशमुख यांनी दैनिक सत्य सह्याद्री प्रतिनिधीशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment