उद्या धनगर समाजाचे फलटण येथे धरणे आंदोलन, एस.टी.प्रवर्गात समावेशासाठी तहसिल कार्यालयासमोर धरणे - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, July 28, 2018

उद्या धनगर समाजाचे फलटण येथे धरणे आंदोलन, एस.टी.प्रवर्गात समावेशासाठी तहसिल कार्यालयासमोर धरणे

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


विक्रम चोरमले / फलटण :-   फलटण शहरासह संपूर्ण राज्यात आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरु असताना आता धनगर समाजही आपला एस.टी.प्रवर्गात समावेश होण्यासाठी आंदोलनास सुरुवात करणार आहे. या मागणीसाठी उद्या रविवार, दि.29 रोजी सकाळी 11 वाजता धनगर समाज बांधवांच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. 


याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले की, महाराष्ट्रातील धनगर समाजाने एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी बारामती येथे 2014 साली फार मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी प्रस्थापित सरकारला खाली खेचून नवीन भाजप सरकारला सत्तेवर आणण्याचा धनगर समाजाने पराक्रम दाखविला. त्यावेळी उपोषण कर्त्यांचे उपोषण सोडण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेवून एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करु असे वचन दिले होते. त्यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते माधव भंडारी, पंकजा मुंडे आदी अनेक पुढारी हजर होते. परंतु ही सर्व नेते मंडळी सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाला पूर्णपणे विसरली. एवढेच नव्हे तर काही धनगर समाजाच्या नेत्यांना हाताशी धरुन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी धनगर समाज बांधवांनी जागरुक राहून एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी शासनाने करण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजाच्यावतीने पुन्हा एकदा आंदोलनाची सुरुवात करण्यात येत आहे. त्यासाठी रविवार, दि.29 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय फलटण येथे धरणे आंदोलन सुरु करण्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कर्मचारी, शेतकरी धनगर बांधवांनी माळजाई मंदिर फलटण येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर समाज आरक्षण कृती समिती, फलटणच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार विजय पाटील यांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment