वॉटर कप स्पर्धेत राज्यात माणचा डंका, टाकेवाडी प्रथम क्रमांक, भांडवली व सिंदखेड व्दितीय, माणवासियांच्या कष्टाचे चीज - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 12, 2018

वॉटर कप स्पर्धेत राज्यात माणचा डंका, टाकेवाडी प्रथम क्रमांक, भांडवली व सिंदखेड व्दितीय, माणवासियांच्या कष्टाचे चीज





सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पुणे :  महाराष्ट्राला पाणीदार करणार्‍या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर झाला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी आंधळी या गावाने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला.
सातारा जिल्ह्यातील भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड यांना संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला आहे. प्रथम क्रमांक मिळवणारं गाव हे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं गाव आहे. ती देखील गेल्या तीन वर्षांपासून पाणी फाऊंडेशनसोबत काम करत आहे.
माण तालुक्यातील टाकेवाडी गावाला प्रथम  क्रमांक पटकवला . या गावाला पुरस्काराची रक्कम 75 लाख आणि मानचिन्ह देण्यात आले. सोबतच, राज्य सरकारकडून अतिरिक्त 25 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. भांडवली गावाने दुसरा क्रमांक पटकवला आहे. बुलडाण्यातील सिंदखेड गावालाही दुसरा क्रमांक प्रदान करण्यात आला आहे. या दोन्ही गावांना पुरस्काराची रक्कम 25-25 लाख अशी विभागून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि राज ठाकरेंसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील भाषणात अभिनेता आमिर खानने महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प फक्त आपला नव्हे, तर राज्यातील 11 कोटी जनतेचा आहे असे म्हटले आहे. सोबतच, हे काम सर्वांचे असून सर्वांनी केल्यानंतरच यशस्वी होईल असेही सांगितले.
कार्यक्रमात राजकीय फटकेबाजी
या कार्यक्रमात उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय टीकास्त्र सुद्धा दिसून आले. सुरुवातीला भाषण करणारे राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि त्यापूर्वीच्या सरकारांनी काम केले नाही अशी टीका केली. एवढेच नव्हे, तर गेल्या 60 वर्षांत सिंचनाचा पैसा कुठे गेला असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यावर अजित पवारांनी काही लोक फक्त बोलतात करत काहीच नाहीत अशा शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरेंचा समाचार घेताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुद्धा समाचार घेतला. राजकीय नेते कधी एक होणार नाहीत फक्त भांडत राहणार याची जाणीव आमिर खान यांना होती त्यामुळेच त्यांनी पाणी फाउंडेशन स्थापित करून स्वतः काही करण्याचा निर्णय घेतला आणि परिणाम सर्वांसमोर आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉटर कप जिंकणार्‍या गावांसाठी राज्य शाससनाकडून 3 पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात पहिला येणार्‍या गावास 25 लाख रुपये, दुसर्‍या गावाला 15 लाख तर तिसर्‍या गावाला 10 लाख देण्याची घोषणा केली. 

No comments:

Post a Comment