सिग्नल यंत्रणा तोडून एक्सप्रेसमधील प्रवाशांची लूट, सालपे-तांबवे दरम्यानचा प्रकार - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 19, 2018

सिग्नल यंत्रणा तोडून एक्सप्रेसमधील प्रवाशांची लूट, सालपे-तांबवे दरम्यानचा प्रकार




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


वाठार स्टेशन:  पुणे - मिरज लोहमार्गावर सालपे रेल्वे स्थानकाजवळ सालपे ते तांबवे गावादरम्यान रविवारी पहाटे अडीच सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने चोरट्यांनी खिडकीतून धाक दाखवत सशस्त्र लूट केली. होम सिग्नल बॉक्स व त्याची वायर चोरट्यांनी तोडली होती. सिग्नल न मिळाल्याने दादर -हुबळी ही रेल्वे थांबल्यानंतर तिच्यावर दगडफेक करुन लूट करण्यात आली.



सालपे- तांबवे दरम्यान असणार्‍या होम सिग्नलचा बॉक्स व वायर अज्ञात दरोडेखोरांनी पहाटे सव्वादोन ते अडीचच्या सुमारास तोडले होते. याच दरम्यान दादर -हुबळी  रेल्वे लोणंद येथून पहाटे दोन वाजुन पाच मिनिटांनी लोणंद रेल्वे स्थानकातून सालपे कडे मार्गस्थ झाली. परंतु, सालपे स्टेशनच्या अलीकडे सिग्नल न मिळाल्याने चालकाला रेल्वे थांबवावी लागली. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी रेल्वेवर दगडफेक करून दहशत निर्माण केली.



पहाटे 3 वाजून 15 मिनीटानी ही ट्रेन जेंव्हा लोणंद ते सालपे या डोंगर रांगाच्या परिसरात आली तेंव्हा ट्रेन मध्येच दबा धरुन बसलेले दहा ते बारा दरोडेखोर हे ट्रेनच्या दिशेने धावत आले. एस वन बोगी जवळ जाऊन एक मेकाच्या खांद्यावर चढून खिडकितून ट्रेनचे दरवाजे उघडा असे ओऱडायला सुरवात केली. त्याच दरम्यान ज्यांनी खिडक्या उघडल्या त्यांच्या गळ्याला चाकू लावून महिलांच्या गळ्यातील दागिनी ओरबडून घेतले तर काहींच्या बॅगा ह्या खिडकितूनच ओढून घेतल्या. हा सर्व प्रकार घडत असताना दरवाजे उघडा नाहीतर गोळ्या घालू अस दरोडेखोर ओरडत होते.



या सर्व गोंधळात साखर झोपेत असलेले प्रवासी जागे  याच डब्याच्या पाठीमागील डब्यात रात्र गस्तीला असलेल्या रेल्वे पोलिसांनी मागचा दरवाजा उघडून शिट्या मारत बाहेर बॅटरीने प्रकाश टाकला. पोलिसांच्या शिट्या एकून दरोडेखोर पळून गेले. यावेळी प्रवास करणार्‍या प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. रुपाली शिंदे यांनी दिलेल्या माहिती नुसार हे सर्व दरोडेखोर हे मराठी भाषिक होते. दरोडेखोर पळून गेले. रेल्वेला सिग्नल न मिळाल्याने थांबल्याचे लक्षात येताच त्वरीत रेल्वे अधिकारी, कर्मचारी , रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले. याबाबतची कारवाई पूर्ण करून रेल्वे पुढे मार्गस्थ केली. याच दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेसही काही काळ या ठिकाणी थांबवावी लागली होती.  नीरा येथून रेल्वे कर्मचारी बोलावून सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आली. सालपे रेल्वे स्थानका जवळ घडलेल्या या प्रकाराने रेल्वे प्रवाशात खळबळ उडाली असुन या बाबतच्या घटना स्थळाचा पंचनामा सातारा  रेल्वे पोलिसांनी केला आहे. दरोड्यानंतर सकाळी रेल्वे पोलिसांनी परिसर पिंजून काढलाच शिवाय सातारा जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनीही घटनास्थळी दोन तपास पथके रवाना केली होती.



No comments:

Post a Comment