महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 19, 2018

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण :   महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्ष पदी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे कार्यरत होते. या वेळी सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव उपस्थित होते.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरदचंद्रजी पवार सर्वांगीण प्रयत्नामुळे खो-खो हा खेळ आशियाई पातळीवर पोहोचला आहे. खो-खो खेळ वाढविण्याचे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे मागील पन्नास वर्षापासून खो-खो चा प्रसार व प्रचार करण्यासाठी अविरत काम सुरु आहे. खो-खोच्या क्षेत्रात देखील मुंबई राज्यापुरती खो-खो खेळाची संस्था स्थापन करावी म्हणून कै. भाई नेरुरकर, शांताराम भोईर, हरिश्चंद्र केणी, बा. गो. पाटणकर यांनी 23 फेब्रुवारी, 1956 व 15 मार्च, 1956 रोजी अशा दोन वेळा खो-खो खेळातील कार्यकर्त्यांची सभा भरवून मुंबई राज्य खो-खो असोसिएशनची स्थापना केली. 1960 साली मुंबई राज्याचे गुजरात व महाराष्ट्र असे दोन भाग स्वतंत्र राज्ये झाल्यामुळे दोन्ही राज्यांना स्वतंत्र असोसिएशन स्थापन करण्यात आली. मराठमोळा खेळ म्हणून खो-खोची महाराष्ट्रात एक प्रभावी संघटना उभारून त्याद्वारे या बहुगुणी खेळाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे एक अंग बनविण्यासाठी कै. भाई नेरुरकर, हरिश्चंद्र केणी, शांताराम भोईर इत्यादींनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची स्थापना केली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला 1957 पासूनची फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता मिळाली. 1959 साली सरकारी शिक्षण खात्याची मान्यता, 1960 साली महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स कौन्सिलची तर 1962 पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची संलग्नता मिळाली.
असोसिएशनला 24 जिल्हे संलग्न आहेत. ह्या 24 जिल्ह्यातील संघ आज स्पर्धा करण्याच्या दृष्टीने स्पर्धेत उतरत असतात. आज पुरुषांमध्ये मुंबई-पुण्यासहित सांगली, ठाणे, मुंबई उपनगर असे संघ वर्चस्व राखून आहेत तर महिलांच्या संघामध्ये सातारा, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई उपनगर, अहमदनगर, सांगली हे आज आघाडीवर खेळत आहेत.  खो-खो खेळाची आणि खेळाडूंच्या नैपुण्याची सांख्यिक नोंद ठेवण्याचे काम महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने प्रत्यक्षात 1968 सालापासून सुरु केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मार्फत तीन वयोगटांच्या पुरुष व महिला अशा राज्य अजिंक्यपद स्पर्धा होतात. 1988-1989 पासून  महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे व्यवसायिक गटांची (पुरुष) मुंबई महापौर चषक खो खो स्पर्धा सुरु झाली.
1975 नंतर कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, तेलंगना, पंजाब, पॉडेचेरी, केरळ इ. राज्यात स्पर्धात्मक चुरस वाढली. महाराष्ट्रात व भारतात ज्यांनी खो-खो च्या संघटनात्मक  कार्याची ध्वजा रोवली त्या दिवंगत भाई नेरुरकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने 1963 साली अति दर्जेदार अशी  भाई नेरुरकर सुवर्णचषक अखिल भारतीय स्पर्धा सुरु केली. येणार्‍या काळात सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची घौडदौड सुरू राहील असे मत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment