खटाव तालुका पंचायत समिती सभापती उपसभापती राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी सदस्यांचा आखाडा; शुक्रवारी होणाऱ्या पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीकडे व श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या मास्टरस्ट्रोककडे सर्वांचे लक्ष - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, August 2, 2018

खटाव तालुका पंचायत समिती सभापती उपसभापती राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी सदस्यांचा आखाडा; शुक्रवारी होणाऱ्या पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीकडे व श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या मास्टरस्ट्रोककडे सर्वांचे लक्ष

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

औंध :- खटाव तालुक्यातील सभापती, उपसभापती राजीनाम्यासाठी मागील आठवड्यात चांगल्याच नाटयमय घडामोडी घडल्या असून पंचायत समिती मध्ये अबाधित सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐन आकाडात का आखाडा भरला ?याची चर्चा खटाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली असून  शिळ या कडीला  उकळी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान आज शुक्रवारी वडूज येथे होणाऱ्या पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे आज अविश्वास ठराव दाखल होणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


खटाव तालुक्याचे विधानसभेचे तीन मतदार संघात त्रिभाजन झाल्याने अगोदरच खटाव तालुक्यास हक्काचा मतदार संघ नसताना  पदासाठी राष्ट्रवादी मध्ये साठमारी झाली तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खटाव पंचायत समिती मध्ये खांदेपालट होणार का की भविष्याचा वेध घेऊन पंचायत समिती मध्ये परिस्थिती जैसे थे राहणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.


खटाव तालुक्याचे मागील दहा वर्षापूर्वी त्रिभाजन झाल्याने खटाव तालुक्यातील जनतेस हक्काचा आमदार नाही. सध्या खटाव तालुक्याचे तीन आमदार नेतृत्व करीत आहेत. कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, माणमधून जयकुमार गोरे तर कोरेगाव विधान सभा मतदार संघातून शशिकांत शिंदे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  सत्ता असून ही हक्काच्या खटाव माण मतदार संघामध्ये आ.जयकुमार गोरे यांनी मागील दहा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत केले आहे.


सध्या खटाव पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे  यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य आहेत तर काँग्रेस, भाजपाचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. त्यामुळे बहुमत असूनही अचानक सभापती उपसभापतींंविरोधात जिल्हाधिकार्यांकडे अविश्वास दाखल करून अन्य सहा सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला. त्याचा परिणाम मागील चार ते पाच दिवसांमध्ये पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खांदेपालट होणार की परिस्थिती जैसे थेच राहणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे हे नेमकी कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे बनले आहे. त्यातच सभापती संदिप मांडवे हे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या जि.प  व पंचायत समिती मतदार संघातून निवडणूक आल्याने गायत्रीदेवींच्या भूमिकेला ही महत्त्व प्राप्त झाले आहे.


सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती सदस्यांमध्ये  पदासाठी सुंदोपसुंदी सुरू असली तरी हे आगामी निवडणुका पहाता पक्षाला नपरवडणारे आहे. त्यातच सभापती संदीप मांडवे यांनी मागील एक ते सव्वा वर्षात खटाव तालुक्यात पक्षाचे चांगले संघटनही निर्माण केले आहे. त्यामुळे नेमके काय करायचे याचे कोडे नेतेमंडळींसमोर निर्माण झाले आहे. अचानक उदभवलेल्या  या परिस्थितीवर अहिस्ता अहिस्ता पावले टाकणे गरजेचे बनले असून यापुढील काळात नेमकं काय होणार कोण कोणाची विकेट काढणार का की ज्येष्ठ नेतेमंडळी पदाधिकाऱ्यांची मोळी बांधण्यात यशस्वी होणार ते चित्र येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे.


सभापती संदिप मांडवे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये अल्पावधीत रूजलेला असताना संदिप मांडवेंसारख्या नव्या दमाच्या कार्यकर्त्याला कोणाच्या हट्टासाठी बाजूला करण्याचा चंग बांधला जात आहे हे शोधणे गरजेचे असून  शुक्रवारी नेमके का य होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून गुरूवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वडूज येथे बैठक झाली असून त्या बैठकीत नेमके काय झाले हे समजू शकले नाही मात्र आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर खटाव पंचायत समिती मध्ये खांदेपालट.होणार की परिस्थिती जैसे थे राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी शुक्रवारी नेमका कोणता मास्टरस्ट्रोक मारणार ?त्यांची भूमिका काय राहणार हेही पाहणे गरजेचे असून संदिप मांडवे हे त्यांच्या मतदार संघातून येत असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

No comments:

Post a Comment