खटाव मध्ये कमळ फुलले, आमदार शशिकांत शिंदेंसाठी धोक्याची घंटा, प्रदीप अण्णांना झटका - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, February 25, 2019

खटाव मध्ये कमळ फुलले, आमदार शशिकांत शिंदेंसाठी धोक्याची घंटा, प्रदीप अण्णांना झटका


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
 गेला महिनाभर खटाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक चांगलीच गाजत होती. खटाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी एकूण 83.28 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या खटाव ग्रामपंचायतीच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी कोरेगाव मतदार संघातील भाजपचे संभाव्य उमेदवार महेश शिंदे यांंनी राहुल पाटील यांच्याशी आघाडी केली होती. भाजपचे महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्या 20 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. 18 पैकी भाजपचे 15 उमेदवार निवडून आले आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. खटाव ग्रामंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यामुळे कोरेगाव मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. सरपंचपदाची निवडणुक थेट जनतेतून झाली. यामध्येही भाजपचे नंदू वायदंडे यांनी राष्ट्रवादीचे विजय बोबडे यांचा दारूण पराभव केला.
दरम्यान राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणारी खटाव ग्रामपंचायच्या 18 जागांसाठी एकूण 7968 मतदारांपैकी 6636 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गेले महिनाभर प्रचाराचा धुराळाच उडाला होती. राष्ट्रवादीने सत्ता राखण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी सभा घेवून लोकांच्यात विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपचे महेश शिंदे यांनी खटाव ग्रामपंचायतीची सत्ता एकदा भाजपला द्या, कायापालट करून दाखवतो. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा प्रदिप विधाते यांनी सांभाळली होती. कोरेगाव मतदार संघातील खटाव ग्रामपंचायतीची सत्ता ही महत्वपूर्ण मानली जाते. गेले 20 वर्षे सत्ता राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे याच्या ताब्यात होती. यावेळी मात्र लोकांनी आ. शशिकांत शिंदेना नाकारले आहे. मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाल्यानंतर निकाल कोणाच्या बाजुने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
खटाव ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण 18 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. यावर्षी थेट सरपंच जनतेतून निवडला जाणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. तरुणाईबरोबरच वृद्धांनीही मतदान केले. एक वयोवृद्ध मतदार तर चक्क सलाईनच्या बाटलीसह मतदानासाठी आले होते. निकालाचे आकडे राष्ट्रवादीच्या विरोधात बाहेर आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत कोेरेगाव मतदार संघात विधानसभेलाही कमळ फुलणार असा दावा अनेकांनी यावेळी बोलताना केला आहे. मोठी मतदार संख्या असलेली खटाव ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीच्या हातून गेल्यामुळे विद्यमान आ. शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदार संघातून विधानसभेची निवडणुक म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही. कारण कोरेगाव शहरातील नगर पंचायतही आ. शिंदे यांच्या विरोधात आहे. कोरेगाव बरोबर सातारा तालुक्यातील काही गावांमध्येही आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धोक्याची घंटा आहे, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment