भारतीय हवाई दलाचे पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ले - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, February 26, 2019

भारतीय हवाई दलाचे पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ले



सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क -पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्याविरोधात मोठी लष्करी कारवाई केल्याचे वृत्त आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त प्रसारित केले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाने मिराज २०० या लढाऊ विमानांद्वारे पाकव्याप्त काश्मीर भागात १००० किलोचे बॉम्ब टाकले आहेत. 'जैश-ए-मोहम्मद' या दहशवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने बालाकोटमधील दहशतवादी तळांवर ही कारवाई केली असून बालाकोट परिसरातून स्फोटाचे मोठे आवाज आल्याचेही सांगितले जात आहे. 



१२ मिराज लढाऊ विमानांद्वारे बॉम्बवर्षाव


एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २०० या लढाऊ विमानांनी आंतरराष्ट्रीय सीमा पार करत बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात 'जैश-ए-मोहम्मद' या संघटेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपल्या सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. 


दरम्यान, भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानने आज पहाटे केला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने त्याविरोधात कारवाई केल्यानंतर भारतीय विमाने परत गेली असेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत भारतावर हा आरोप केला आहे. भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर गफूर यांनी आणखी एक ट्विट केले. भारतीय हवाई दलाने मुझफ्फराबाद भागातून घुसखोरी केली असे त्यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराने योग्य वेळी भारताला प्रत्युत्तर दिल्याचा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment