शहर वाहतूक शाखा धुंदीत; सातारकर अडकले कोंडीत - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, April 18, 2019

शहर वाहतूक शाखा धुंदीत; सातारकर अडकले कोंडीत

  
  सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
..............................................
सातारा : पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरमुळे सातारकरच काय पण सातार्‍यात बाहेरगावाहून येणारे नागरीकही वैतागले आहेत. अशातच शहरातील अंतर्गत व महत्त्वाचे रस्तेही कोंडी अडकले असून वाहतूक शाखा मात्र कोमात गेली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत राजवाडा ते समर्थमंदीर रस्ता वाहतूक कोंडीत पुरता गुदमरून गेला. अनेक वाहनधारकांना स्वत: रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांचे काम करावे लागले.
राजवाडा ते समर्थ मंदिर रस्ता हा शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते. परंतु, राजवाडा ते गोल मारुती मंदिरापर्यंत हा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यातच रस्त्यावर झालेली अतिक्रमणे बेशिस्त पार्किग यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. राजधानी टॉवरसमोर असलेले दुचाकी पार्किंग, समोरच्या दुकानदारांनी पायर्‍या बांधून केलेले अतिक्रमण आणि त्यातच दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी, पुढे तुळजाभवानी कॉम्प्लेक्स ते रमाकांत टॉवरपर्यंतही तीच स्थिती आहे. त्यामुळे मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. राजधानी टॉवरच्या कोपर्‍यावर अवजड वाहनांना बंदी असा फलक आहे. मात्र, तो केवळ नावालाच आहे.
गुरुवारी सकाळपासूनच या रस्त्यावर दर तासाभराने मोठी कोंडी होत होती. दुपारी भर बारा वाजताच्या उन्हात किमान अर्धा तास व सायंकाळी सात नंतर रात्री साडेआठवाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. सध्या सुट्यांचे दिवस असल्याने शहरातून कास पठार, सज्जनगडकडे, ठोसेघरकडे जाणार्‍या पर्यटकांच्या गाड्या याच मार्गावरून जातात. त्यांना या कोंडीचा फटका बसला. रस्त्यात मध्येच उभ्या असलेल्या छोटा हत्ती, वॅगनर गाड्यांमुळे झालेली कोंडी सोडवण्यासाठी कोंडीत अडकलेले रिक्षाचालक व काही वाहनधारकच रस्त्यावर उतरले व त्यांनी वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले. तरीही सुमारे तासाभरापेक्षा जास्त काळानंतरही वाहतूक धीम्या गतीनेच सुरु होती.
वाहतूक शाखा धुंदीत
आधीच नव्याने आलेल्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाहतूक पोलिसांना कागदपत्रे न तपासण्याचे आदेश दिल्यापासून वाहतूक पोलिसांमध्ये नाराजी आहे. अर्थात ही नाराजी का आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वाहतूक शाखेचे निरीक्षक सुरेश घाडगे नुसतेच जिप्सीतून फिरत असतात. गाडीत बसूनच केवळ अमूक नंबरची गाडी काढा, ही गाडी तिकडे लावा एवढेच काम करत असल्याचे दिसते. कारण ग्रेड सेपरेटरच्या कामानंतर जो मास्टर प्लॅन तयार करायला हवा होता तो न केल्याने शहरात मोठ्या प्रमाणवर कोंडी होत आहे. त्याचे वाहतूक शाखेला सोयरंसुतक नाही.
अधीक्षांनीच रस्त्यावर उतरावे
अधीक्षक तेजस्वी सातपुते या पुणे येथे वाहतूक आयुक्त होत्या. त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणच्या वाहतुकीला शिस्त लावली. आता त्यांनीच रस्त्यावर उतरून सातारच्या वाहतुकीला शिस्त लावावी व वाहतूक शाखेच्या कारभाराचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील पदपथांवर, रस्त्यांवर व्यापार्‍यांनी अतिक्रमणे केल्यामुळेही शहरातील कोंडीत वाढ झाली आहे. मात्र, पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक केवळ नावालाच आहे. राजकीय स्वार्थासाठी शहराच्या दोन्ही नेत्यांकडून याकडे दुर्लक्ष होते. शिवाय आता निवडणुकीचा हंगाम त्यामुळे काही बोलायलाच नको. त्यामुळे ही अतिक्रमणे हटतील की नाही याबाबत शंका आहे. आता एखादा सुजाण सातारकर याविरोधात न्यायालयात गेला तरच काहीतरी होऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी परिस्थिती येण्यापूर्वीच पालिका, पोलीस प्रशासनाने एकत्रीत बैठक घेऊन कोंडीची समस्या कायमची मार्गी लावावी, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment