वाई तालुक्याचा बिवड बदलतोय - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, May 26, 2019

वाई तालुक्याचा बिवड बदलतोय



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.................................................
वाई :  वाई तालुका हा हळदीच्या पिकासाठी पूरक आहे. या तालुक्यातील अनेक गावांमधून हळद पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.  तालुक्यातील जमीन सुपीक असल्याने ऊसा बरोबर हळदी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येतो. वाई तालुक्यातून महाराष्ट्राची भाग्यरेषा कृष्णा नदी व धोम धरणाचे डावे-उजवे कालवे जात असल्याने लाभ क्षेत्रात पाण्याची मुबलकता असल्याने हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरी मालाचा दर्जा उत्तम पद्धतीचा ठेवत असल्याने हळदीला संपूर्ण देशभरातून मागणी आहे.  वाई-पाचगणी रस्त्यावर शहाबाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत संपूर्ण रस्त्यावर या परिसरातील शेतकर्‍यांनी  हळदीची पावडर विकण्यास ठेवलेली असते. त्याला पाचगणी महाबळेश्वरला येणार्‍या पर्यटकांची सुध्दा मोठी पसंती असल्याचे दिसून येते.
बाजार समितीमध्ये हळदीचे व्यापारी हळद खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांना हाकेच्या अंतरावर बाजार पेठ उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांचा वाहतूक खर्च वाचतो. त्यातच तालुक्यातील शेतकरी व्यापार्‍यांकडून हवे तेव्हा पैसे उचलत असल्याने पिकासाठी खर्च करण्यासाठी शेतकर्‍यांना भांडवल सहज उपलब्ध होते.
गेल्या पाच वर्षात दहा हजारांच्या वरती हळदीला भाव मिळाला आहे. तालुक्यात सोन्याचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची कमी नाही. हे पिक स्पर्धात्मक असल्यानेच शेतकर्‍यांचा कल या पिकाकडे आहे. तसेच या पिकाचा बिवड हा दुसर्‍या  पिकासाठी उत्तम प्रतीचा होत असल्यानेच हळदीचे उत्पन्न घेताना शेतकरी दिसत आहे. वाई तालुक्यात शहाबाग, खानापूर, ओझर्डे, पांडे, जोशिविहीर, बावधन, मेणवली, धोम या गावांमधून हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.
यासंदर्भात माहिती देताना वाई बाजार समिती  सभापती लालासाहेब पिसाळ म्हणाले, सन 2013-14 मध्ये हळदीला कमीतकमी- सहा हजार, जास्तीत-जास्त- अकरा हजार, तर सरासरी भाव हा आठ हजार पाचशे इतका मिळाला, 2014-15 साली-सहा हजार, बारा हजार, व नऊ हजार इतका मिळाला होता. 2015-16 साली- सात हजार, बारा हजार, नऊ हजार पाचशे, मिळाला, 2016-17 साली आठ हजार, दहा हजार, व नऊ हजार मिळाला, 2017-18 साली- पाच हजार, नऊ हजार, व आठ हजार मिळाला, नुकताच जाहीर झालेला भाव हा सात हजार, आठ हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे पर्यंत मिळेल. एकंदर हळदीचा भाव अनियमित दिसून येत आहे. त्यामुळे अतिशय धाडसाने हे पिक घेतले जाते.
हळद उत्पादक  शेतकर तानाजी ठोंबरे म्हणाले, शेणखत एक ट्रॉली सहा हजार रुपये प्रमाणे पाच ट्रॉली शेणखतासाठी तीस हजार मोजावे लागतात. दहा महिन्यांचे पीक असल्याने 19 रोटेशन पाणी द्यावी लागतात. तीन हजाराप्रमाणे पन्नास हजार रुपये फक्त पाण्यासाठी खर्च करावा लागतो. पाणी भाड्याने घ्यावे लागल्यास दोनशे रुपये तासांनी पाणी विकत घ्यावे लागते. मजुरी महिलांसाठी दोनशे रुपये तर पुरुषांसाठी चारशे रुपये मोजावे लागतात. एक एकर हळद काढणीसाठी तीन दिवस लागत असून प्रत्येक दिवशी दहा पुरुष व तीस महिला काम करतात. पंधरा हजार काढणीसाठी तर पाच हजार पाला काढण्यासाठी खर्च करावा लागतो, रासायनिक खतांसाठी वीस हजार रुपये मोजावे लागतात. बियाणे पंधरा हजार रुपये, मशागत करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येतो. शिजविण्यासाठी क्विंटलला तीनशे पन्नास रुपये तर पॉलीशला दहा हजार खर्च करावा लागतो. यामध्ये शेतकर्‍यांच्या कष्ठाचा विचार केलेला नाही. जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च एकरी करावा लागतो उत्पन्न मात्र एकरी एक लाख साठ ते सत्तर हजार मिळतात.  शेताचा बिवड चांगला तयार होतो व अंतर्गत पीक घेता येत असल्याने वाई तालुक्यातील शेतकरी हळद उत्पादन घेताना दिसत आहे. हळदी मध्ये- मिरची, गवार, काकडी, भेंडी ही नगदी पिके घेण्यात येतात. तसेच हळद निघाल्यानंतर दुसरे पीक चांगल्या प्रतीचे घेता येते.

No comments:

Post a Comment