दार्‍याचे काम रखडल्याने संताप - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, May 26, 2019

दार्‍याचे काम रखडल्याने संताप



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
वडूज : वाकेश्‍वर (ता. खटाव) येथील उरमोडी कॅनॉलवर लक्ष्मीमाता मंदिरानजीक नवीन दारे मंजूर झाले आहे. या दार्‍याचे काम वेळेत न झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांना पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात टाहो फोडावा लागत आहे.
माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, न्या. मदन गोसावी व इतर प्रमुख पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नातून नायकाचीवाडी येथील ब्राह्मणमळा, सिध्देश्‍वर कुरोली येथील रानमळा शिवारातील मोडा दारे व वाकेश्‍वर, सातेवाडी अशी एकूण तीन नवीन दारी उरमोडी कॅनॉलवर मंजूर झाली आहेत. यापैकी वाकेश्‍वर वगळता इतर तीन ठिकाणच्या दार्‍याची कामे मार्गी लागल्याने संबंधित गावातील शेती पाण्याबरोबर जनावरांच्या चार्‍याचा, पिण्याच्या पाण्याचा बहुतांशी प्रश्‍न मिटला आहे. वाकेश्‍वर येथील दारे वेळेत पूर्ण झाले असते तर करंजओढ्यामार्गे उरमोडीचे पाणी येरळा नदीपात्रात येवून त्याचा फायदा गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीचे पाणी वाढण्यास झाला असता. मात्र कामाचा कार्यारंभ मिळाल्यानंतर सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर ठेकेदारांनी काम सुरु केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हार, तुर्‍याचा कार्यक्रम झाला. मात्र दोन दिवसानंतर कालव्याचे आवर्तन सुटल्याने दार्‍याच्या कामासाठी खोदावा लागलेला पाया बुजवावा लागला. त्यानंतर गेले महिनाभर कॅनॉलमध्ये पाणी सुरु असल्याने दार्‍याचे काम ठप्प आहे. हे काम वेळेत सुरु न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. दरम्यान पिण्याच्या पाणी टंचाई संदर्भात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती, तहसिलदार कार्यालयासही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र या पत्रव्यवहारास संबंधितांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही.
संबंधित ठेकेदारांने  काम सुरु केले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र फडतरे व माजी उपसरपंच संदीप दळवी यांनी दिला आहे. यावेळी शिवाजीराव फडतरे, तानाजी फडतरे, हिंदुराव फडतरे, दुर्योधन धुमाळ, गणेश फडतरे, नामदेव राऊत, राजेंद्र फडतरे, गणपत फडतरे, संतोष फडतरे, सुरज भांडवलकर, अमोल धुमाळ, नाना फडतरे, अनिल फडतरे, नामदेव फडतरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment