जिहे-कठापूर योजनेचे लोकार्पण पतंप्रधान मोदींच्या हस्ते - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, June 10, 2019

जिहे-कठापूर योजनेचे लोकार्पण पतंप्रधान मोदींच्या हस्ते




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
खटाव: लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर जलसंयोजना निर्धारीत वेळतच पूर्ण होणार आहे.  या याजनेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्याचा मानस आहे असा विश्वास लक्ष्मणराव इनामदार टृस्टचे सचिव सुहास जोशी यांनी व्यक्त केला.
खटाव, ता.खटाव येथील चंद्रहार पाटील क्रीडा संकुल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी  अशोक कुदळे, मोहन घाडगे, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, अ‍ॅड. श्रीनिवास मुळे, अभिजित देशमुख, संजय टकले, चरण बोबडे  उपस्थित होते.
 जोशी म्हणाले, युती शासनाने 1997 मध्ये जिहे-कठापूर योजना तयार केली. परंतू आघाडी शासनाने सत्तेवर येताच ती बासनात गुंडाळली. केंद्र व राज्यात सत्तांतर झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या विचाराने प्रेरीत होऊन खटाव-माणचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ट्रस्टने प्रयत्न सुरु केला. रथयात्रा, निवेदन व प्रत्यक्ष पाठपुरावा यामुळे या योजनेस चालना मिळाली. मूळ 269 कोटी रूपयांच्या योजनेला 1085 कोटींची नवी ‘सुप्रमा’ नोव्हेंबर 2017 मध्ये मिळाली. जल आयोगाची मान्यता मिळाली. मध्यतंरी खटाव येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी तातडीने 150 कोटींचा निधी देत गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर जलसंयोजना असे नामकरण केले. सध्या कृष्णा नदीवरील बंधार्‍याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यावर स्वयंचलीत दरवाजे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूचे भराव पूर्ण झाले आहेत. तिन्ही पंपहाऊसचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पॉवर हाऊससाठी लागणारा 36 के व्ही ए चा विद्युत पुरवठा मंजूर झाला आहे. रेल्वे क्रॉसींग सुद्धा प्रगतीपथावर आहे. वर्धनगड बोगदा ते जरंडेश्वर कारखाना पर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. यामुळे ऑगस्ट 2019 मध्ये नेर तलावात पाणी येईल.

No comments:

Post a Comment