भाजप प्रवेशासाठी आमदार जयकुमार गोरेंचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, June 7, 2019

भाजप प्रवेशासाठी आमदार जयकुमार गोरेंचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’


संदीप कुलकर्णी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
...............................................................

सातारा :  माणचे आमदार जयकुमार गोरे यांची सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी जवळीक भलतीच वाढली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पवारांच्या भेटीचा दाखला देत मी कुणाला भेटलो म्हणून भाजपच्या वाटेवर कसे काय? असा प्रश्‍न उपस्थित करून जरी त्यांनी स्वत:च्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी रणजितसिंह निंबाळकरांच्या खासदारकीसाठी केलेले काम आणि काँग्रेसमध्ये असंतुष्ट असणार्‍या नेत्यांच्या गाठीभेटी यावरून गोरे भाजपशी घरोबा करतील किंवा करणारही नाहीत, मात्र, भाजपच्या जवळीकीचा लाभ ते उठवू शकतात. त्यामुळे विधानसभा उमेदवारीबाबत पक्की खात्री होईपर्यंत प्रवेशाबाबतची त्यांची भूमिका ‘वेट अँड वॉच’ राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्ती सूत्रांचे म्हणणे असून तुर्तास तरी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी दिसत आहे. 
2009 पूर्वी फलटण तालुक्यातील 36 गावे व संपूर्ण माण तालुका मिळून माण विधानसभा मतदारसंघ होता. गेली 40 वर्षे हा मतदारसंघ राखीव होता. 2009 च्या पुनर्रचनेत माण मतदारसंघ खुला झाला. परंतु, पूर्वीच्या 258 खटाव विधानसभा मतदारसंघाचे त्रिभाजन होऊन खटाव तालुक्यातील वडूज, मायणी, निमसोड, औंध, हे जिल्हा परिषद गट माण मतदारसंघाला जोडली गेली. दुसरीकडे पुसेसावळी जिल्हा परिषद गट कराड उत्तरेला तर खटाव व बुध जिल्हा परिषद गट हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाले. 2004 साली डॉ. येळगावकर हे प्रभाकर घार्गे यांचा पराभव करत विक्रमी मताधिक्क्याने खटावमधून विजयी झाले. पश्‍चिम महाराष्ट्रातील ते भाजपचे पहिले आमदार. तरीही भाजपने त्यांना म्हणावे असे बळ दिलेच नाही.  मतदारसंघ माणमध्ये गेल्याने डॉ. येळगावकर यांना माणमधून उमेदवारी लढवावी लागली. जयकुमार गोरे, माणचे 40 वर्षे किंगमेकर असलेले सदाशिवराव पोळ आणि डॉ. दिलीप येळगावकर यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत विधानसभेपूर्वी आंधळी गटातून जिल्हापरिषद सदस्य म्हणून कारकीर्द गाजवलेले जयकुमार गोरे ‘अपक्ष’म्हणून विजयी झाले.
2009 साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली. कितीही झाले तरी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाची पक्की जाण आलेल्या गोरेंनी सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सांगलीतील कारकिर्दीतून निर्माण झालेल्या कै. डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम यांच्या ऋणानुबंधातून गोरे काँग्रेसवासी झाले. सत्तेचा फायदा उठवत त्यांनी माणमध्ये आपले चांगलेच बस्तान बसवले. बघता बघता 2009 ची कारकीर्द संपून गेली. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. ‘भाऊबंदकी’चा सुरुंग जयकुमार गोरेंच्या घरात लागला होता. 2009 च्या जयकुमार गोरेंचे इलेक्शन मॅनेजमेंट सांभाळणारे शेखर गोरे यांनी जयकुमार यांच्याशी सवतासुभा मांडला. त्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली.
अशातच 2014 च्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले. शेखर गोरे यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाजपक्षातून निवडणूक लढवली. देशात नरेंद्र मोदींची लाट होती राज्यातही आलेल्या देवेंद्र लाटेत भाजपचे सरकार आले. परंतु, शेखर गोरे थोडक्या मतांनी पराभूत झाले आणि जयकुमार गोरे पुन्हा आमदार झाले. याखेपेस सत्ता नसल्याने जयकुमार विरोधी आमदार झाले. त्यांच्या काँग्रेस पक्षाकडून ‘जातीयवादी’ राजकारण झाल्याचे त्यांचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. त्यामुळे ‘कॅपॅबल’ असूनही गोरेंसारखा आक्रमक आमदार काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होऊ शकला नाही. ज्या ‘बाबां’च्या जिवावर जयकुमार नाचत होते. त्यांनीही ऐनवेळेस ‘हात’ वर केल्याने जयकुमार एकाकी पडले. त्यातच भावाभावांमधील वाद, दाखल झालेले काही गुन्हे यामुळे बॅकफूटवर गेलेले जयकुमार यांना लोकसभा निवडणूकीत ‘बळ’ मिळाले. राष्ट्रवादी हा आपला प्रमुख विरोधक असल्याचे जयकुमार यांनी ओळखले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रमुख शत्रू तो आपला मित्र या न्यायानुसार त्यांनी रणजितसिंहांच्या उमेदवारीच्या माध्यमातून नवा डाव टाकला. सार्‍या घडामोडीत भाजपला मोहिते-पाटीलही मिळाले या सार्‍यात रणजितसिंहांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. तेव्हापासून आमदार गोरेंची भाजपची जवळीक वाढली आहे. ते वारंवार भाजप प्रवेशाची शक्यता नाकारत असले तरी त्यांची पावले त्याच दिशेने आहेत, हे सांगायला कोणा जोतिषाची गरज नाही.
प्रश्‍न उमेदवारीचा
आमदार गोरे यांच्यादृष्टीने माणमधील आमदारकी महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजप प्रवेश केला तर भाजपकडून उमेदवारी मिळणे हे त्यांचे पहिले टार्गेट आहे. अद्याप राज्यातील सेना-भाजप युतीचे त्रांगडेही सुटलेले नाही. अशा परिस्थितीत माण मतदारसंघ कुणाला जाईल हे स्पष्ट नाही. त्यामुळे आता प्रवेश केला अन् पुन्हा मतदारसंघ भाजपला न मिळता रासपला मिळाला तर पुन्हा गोरेंचा नरेंद्र पाटील व्हायचा. याचा फटका निकालात बसू शकतो. त्यामुळेच आमदार गोरेंनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे निकटवर्ती सूत्रांचे म्हणणे आहे.
मतदारसंघावरील पकड झाली ढिली
सद्यस्थितीत माण मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मिळालेले मताधिक्य पाहता आमदार गोरेंची मतदारसंघावरील पकड ढिली झाल्याचे जाणवते. जर शेखर गोरे गट, भाजप आणि आमदार गोरे यांनी लोकसभेला पळून काम केले असते तर भाजपच्या उमेदवारला इथून किमान 50 ते 60 हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदारांचे न ऐकता राष्ट्रवादीला मतदान केल्याने निंबाळकरांचे मताधिक्य कमी झाले.
मूळ भाजपचा विरोध राहणार
एकीकडे माणमधून भाजपमधून लढण्याची घोषणा भाजप नेते डॉ. येळगावकर यांनी आधीच केली आहे. त्यात आता आमदार गोरेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येऊ लागल्याने माणमधील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांंच्याकडून गोरेंच्या प्रवेशाला 100 टक्के विरोध आहे. हा विरोध डावलून जरी भाजपने आमदार गोरेंना प्रवेश आणि उमेदवारी दिली तरी हे कार्यकर्ते विरोधी उमेदवाराचे काम करतील, अशी स्थिती आहे.
गोरेंवर येऊ शकते अपक्ष लढण्याची वेळ
जर सेना-भाजप युती झाली, गोरेंचा भाजप प्रवेश झाला नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इंदापूर-माण साट्यालोट्यात माणची जागा राष्ट्रवादीला गेली तर येथे भाजप-राष्ट्रवादी असा सामना होऊ शकतो. त्यामुळे 2009 प्रमाणे पुन्हा एकदा आमदार गोरे अपक्षही लढू शकतात, असा काही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तरीही जर-तर ला राजकारणात काहीही अर्थ नाही आणि राजकारणात काहीही घडू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांत काय घडामोडी घडतात, हे पाहणे निश्‍चितच औत्सुक्याचे आहे.

No comments:

Post a Comment