पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, June 11, 2019

पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं





सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
...............................................................
मायणी : ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. लढा पाण्याचा, तहानलेल्या जीवांचा. टेंभूचे पाणी मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देत कलेढोण सह सोळा गावांना टेंभू योजनेचे शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी सर्वपक्षीय मेळावा संपन्न झाला. जर विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी या भागास टेंभूचे पाणी मिळाले नाही तर यापुढे होणार्‍या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ऐतिहासिक ठराव माण- खटाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या व या सोळा गावातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कलेढोण सह सोळा गावांना टेंभू योजनेतून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी खटाव तालुक्यातील विखळ सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. टेंभूचे पाणी मिळावे यासाठी सोळा गावातील नागरिक  व सरपंचांची संघटना बांधून पाण्यासाठी वज्रमूठ तयार करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. 
यावेळी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे म्हणाले, हा मेळावा कोणत्याही नेत्यांनी बोलाविला नसून हे जनतेने उभारलेले आंदोलन आहे. त्यामुळे नेत्यांना निमंत्रित न करता देखील सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत हे या मेळाव्याचे यश आहे. खटाव तालुक्यातील काही भागात जिहे _कठापुर ,तारळी, उरमोडी व टेंभूचे पाणी आल्यामुळे काही भाग सुखावला आहे. मात्र, या सोळा गावात कोणत्याही प्रकारच्या पाण्याची योजना नसल्याने केवळ टेंभूचे पाणी हाच आशेचा स्त्रोत आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत आहेत. या लढ्याला चांगले स्वरूप प्राप्त व्हावे. सर्व नेते मंडळींनी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा व सरकारला टेंभूचे पाणी देण्यासाठी भाग पाडावे. पाण्यासाठी क्रांती करावी लागली तरी आपण मागे हटणार नाही .
माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यावेळी म्हणाले, हा भाग निसर्गाशी अनेक वर्षे निकराचा लढा देत आहे .पाणी मिळवण्यात आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती असली तरी ते मिळणे गरजेचे आहे. सदर पाणी बंद पाइप मधून देण्याचा निर्णय झाला असून या भागातील सर्व जलस्त्रोत वर्षातून तीन वेळा भरून दिले पाहिजेत. हे पाणी देत असताना पाण्याचे वाटप कसे करावे हे शासनाने ठरवायचे आहे.जनता जेव्हा एखादे आंदोलन हातात घेते तेव्हा त्याला यश येते .
हसणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख म्हणाले, इच्छाशक्ती असली की सर्व मिळते . तोच प्रकार इतर परिसरात पाणी मिळण्यात झाला आहे . यासंबंधात जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंधारण मंत्री ना. विजय शिवतारे यांची भेट घेऊन त्यांना टेंभू पाणी प्रश्नासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी आदेशही काढले आहेत.
 जि. प.सदस्य अनिल देसाई यावेळी म्हणाले, टेंभूचे पाणी या भागात निश्चित येऊ शकते. ते पिण्यासाठी केवळ नको शेतीसाठीही आली पाहिजे. आपण योग्य वेळी जागे झालो आहोत. नुसते सोळा गावांनाच नव्हे तर खटाव- माण मधील सर्व पाण्यापासून वंचित असणार्‍या गावांना हे पाणी  मिळावे यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे.  सरकारने ठरविले तर पाणी मिळण्यात अडचण येणार नाही मात्र राजकीय इच्छाशक्तीची गरज असते व त्यासाठी जनरेटा उभारावा लागतो. या पाणीप्रश्नी जनतेने घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्रभाकर घार्गे यावेळी म्हणाले. दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे.खटाव माण तालुक्यातील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. त्यासाठी सर्व नेत्यांनी पाणी प्रश्न एकत्र येऊन या तालुक्यांच्या माथी असलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
 माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, कलेढोण सह सोळा गावात टेंभूच्या पाण्यासाठी उभारलेले आंदोलन पाणी मिळेपर्यंत थांबता कामा नये. सरकार कोणाचेही असू द्या, पाणीप्रश्‍नासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आल्यास निश्चितपणाने पाणी प्रश्न सुटू शकेल. मात्र लोकांची ही लढ्यासाठी मानसीकता असणे गरजेचे आहे. यापूर्वी मायणी तलावात सोडण्यात येणार्‍या टेंभूच्या पाण्यातून मायणीसह सोळा गावांना पिण्याच्या पाण्याची 24 बाय 7 योजना राबवण्यासाठीचा प्रस्ताव या भागातील लोकांनी द्यावा म्हणून आपण प्रयत्न केले.  मात्र एकही प्रस्ताव दाखल झाला नाही, असा प्रकार या आंदोलनामध्ये होता कामा नये.
 आमदार जयकुमार गोरे यावेळी म्हणाले, जेव्हा जनता आंदोलन हातात घेते तेव्हा नेते आपोआप येतात. सर्व नेते एका स्टेजवर आले ही या जनआंदोलनाचे यश आहे.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे, पं. स. सदस्या मेघा पुकळे, रघुनाथ देशमुख, साईनाथ निकम, विठ्ठल काटकर, भगवान सानप ,किरण जाधव, चंद्रकांत हुलगे, संजीव साळुंखे, सोमनाथ शेटे, अतुल देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम घाडगे माजी सभापती रघुनाथ घाडगे जिजाबा भुटुगडे, सतीश काटकर,महाजीवन प्राधिकरणाचे माजी अधीक्षक अभियंता रमेश इंजे, चंद्रकांत पाहुणे यांनी मनोगते व्यक्त केली.
 प्रस्ताविक विनोद देशमुख यांनी केले. यावेळी जर का टेंभूचे पाणी या भागात मिळाले नाही तर निवडणुकीवर बहिष्कार घालणार का असे चंद्रकांत सानप यांनी विचारल्यानंतर सर्वांनी हात वर करून त्यास संमती दिली.

No comments:

Post a Comment