गोरेंचे कोणते विरोधक लुंगे-सुंगे? खासदार निंबाळकरांची स्वपक्षीय नेत्यांवरच टीका? नवा वाद पेटण्याची चिन्हे - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, June 23, 2019

गोरेंचे कोणते विरोधक लुंगे-सुंगे? खासदार निंबाळकरांची स्वपक्षीय नेत्यांवरच टीका? नवा वाद पेटण्याची चिन्हे


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी: माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी काल आंधळी धरणात झालेल्या एका कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांची पाठराखण करताना विरोधकांवर ‘लुंगे-सुंगे’, अशा शब्दांत केलेल्या टीकेमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता असून त्यांच्या टीकेचा रोख माणमधील भाजप नेत्यांवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निंबाळकरांच्या स्वपक्षीय नेत्यांवरच आरोप केल्याने निष्ठावंत भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेच्या जॅकवेल पंपहाऊसचे सर्वेक्षण आणि अन्वेक्षण विभागाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘लायकी आणि माहिती नसणारे काही महाभाग पाणी आणण्याची भाषा करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत. असे कितीही लुंगे, सुंगे एकत्र आले तरी हिंदकेसरी जयकुमार गोरे यांच्या रविरोधात लढण्याची त्यांची लायकी नाही’, असे वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांच्यावर तोफ डागली. शिवाय माझ्या लोकसभा निवडणुकीत कोणी काय उद्योग केले हे बाहेर काढणार असल्याचेही जाहीर करत स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या कामावर अविश्‍वास व्यक्त केल्याने नवा वाद पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, शेखर गोरे हेही जयकुमार यांचे विरोधक असल्याने त्यांनाही हा आरोप लागू होत आहे.
खासदार पक्षाविरोधात काम करणार का?
येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. आमदार जयकुमार गोरे तुर्तास काँग्रेसमध्ये आहेत. निंबाळकरांनी माणमधून तिकीटाची खात्री दिल्यास ते भाजपमध्ये उडी मारतील. परंतु, तिकीट नाही मिळाले तर निंबाळकरांना गोरेंचा पैरा फेडावा लागेल. त्यानुसार ते पक्षाच्या विरोधात जाऊन गोरेंचे काम करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी होणार
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निंबाळकरांना आमदार जयकुमार गोरेंची संगत सोडण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा निंबाळकरांनी त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. त्याचा वचपा खासदारांनी या कार्यक्रमातून काढल्याचे मानले जात असले तरी खासदारांच्या वक्तव्याने भाजपचे नेतेच नव्हे तर निष्ठावंत कार्यकतेर्र्ही दुखावले गेले असून यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नेमके विरोधी काम केले कुणी?
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस वगळता आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे, भाजपने एकत्र येऊन निंबाळकरांचे काम केले. तरीही त्यांना केवळ 23 हजारांचे मताधिक्य मिळाले उलट राष्ट्रवादीने लक्षणीय मते मिळवली. भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता नक्कीच राष्ट्रवादीला मत देत नाही. मग, राष्ट्रवादीकडे गेलेली मते कुणाची? शिवाय निंबाळकरांनी लोकसभेला कुणी विरोधात काम केले ते लवकरच बाहेर काढणार असल्याचे जाहीर केल्याने माणमधील जनतेला याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे खासदारांनी त्यांच्या विरोधात नेमके कुणी काम केले हे लवकर जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment