माण–खटावमधील 64 गावांना जिहे-कठापूर आणि टेंभूचे पाणी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, July 5, 2019

माण–खटावमधील 64 गावांना जिहे-कठापूर आणि टेंभूचे पाणी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
वरकुटे- म्हसवड
 माण आणि खटाव तालुक्‍यातील 64 वंचित गावांना जिहे-कठापूर उपसा सिंचन आणि टेंभू योजनेचे पाणी देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नांमुळे आज मुंबईमध्ये प्रधान सचिव आणि उच्चपदस्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत विविध आदेश दिल्याने माण आणि खटाव तालुक्‍यातील 64 गावे ओलिताखालील येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.जयकुमार गोरे, प्रधान सचिव चहल, भाजपा नेते महेश शिंदे, प्रकल्प सचिव घाणेकर, अधिक्षक अभियंता विजय घोगरे, मंत्रालयाचे उपसचिव आणि दोन्ही पाणीयोजनांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील धरणांमधून येणारे मोठ्या प्रमाणावरील पाणी विविध योजनांद्वारे इतर जिल्ह्यांना देण्यात येते. मात्र जिल्ह्यातीलच माण आणि खटाव या कायम दुष्काळी तालुक्‍यांवर अन्याय केला जातो.

या अन्यायाविरोधात आ.जयकुमार गोरेंनी नेहमीच आवाज उठवला होता. अगोदर या दोन तालुक्‍यांची तहान भागवा आणि पाणी न्यायचे तिकडे न्या असे त्यांनी अधिवेशनातही सांगितले होते. जिहेकठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील 32 गावांना देण्याची मागणी आ. जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. खटाव तालुक्‍यातील मायणीसह 16 आणि कुकुडवाडसह 16 अशा 32 गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरु ठेवला होता. अगदी पाणी मिळाले नाही तर उद्रेक होवून टेंभूचा कॅनॉल फोडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अधिवेशनातही त्यांनी त्याबाबत भूमिका मांडली होती.

जिहे-कठापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्‍यातून माण तालुक्‍यातील आंधळी धरणात येणार आहे. या योजनेद्वारे माणगंगा नदी प्रवाहीत करण्याचे प्रयोजन आहे. मात्र माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील 32 गावांना कोणत्याच योजनेचे पाणी मिळणार नाही हे ध्यानात घेऊन आ.जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. या गावांना पाणी मिळण्यासाठी आंधळी धरणातून पाणी उचलून 32 गावांना देण्याची योजना त्यांनी सादर केली.

महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळ सिंचन भवन येथून जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना त्याप्रमाणे अहवाल सादर करण्यात आला होता. गेल्याच आठवड्यात आंधळी धरण परिसरात या कामाच्या सर्वेक्षण आणि अणवेक्षणाचे काम सुरुही करण्यात आले आहे. टेंभू योजनेचे पाणी खटाव आणि माण तालुक्‍यातील 32 गावांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आज झालेल्या बैठकीत त्यांनी 22. 5 टीएमसी पाण्याला धक्का न लावता अतिरिक्त अडिच टीएमसी पाणी 32 गावांना देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी जलआयोगाची मान्यता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिहे-कठापूर आणि टेंभू योजनेचे पाणी माण आणि खटाव तालुक्‍यातील 64 गावांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर दोन बैठका झाल्या होत्या. मात्र निर्णय होइपर्यंत आ.गोरेंनी याबाबत कुठेच वाचता केली नव्हती. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या कामासाठी मोलाची मदत केली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही सुरुवातीपासूनच आ.गोरेंच्या पाठपुराव्याला सहकार्य केले.

माण–खटावसाठी ऐतिहासिक क्षण …… 
माझ्या आमदारकीच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये उरमोडीचे पाणी माण आणि खटाव तालुक्‍यात आणून 40 टक्के भाग टंचाईमुक्त करण्यात मला यश आले होते. तो क्षण आमच्यासाठी ऐतिहासिकच होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासाठी दुसरा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही तालुक्‍यातील 64 गावे ओलिताखाली येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. उत्तर माणमधील 32 गावे आणि खटाव तालुक्‍यातील मायणी, कुकुडवाडसह 32 गावांची तहान आता भागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या सुचना सचिवांना दिल्या आहेत. निरा देवधरचे चुकीच्या पध्दतीने बारामतीला जाणारे पाणी धोमबलकवडीच्या कॅनॉलमधून लाभक्षेत्राला देण्यासाठी गावडेवाडी येथून पाणी उचलण्याच्या दिडशे कोटींच्या योजनेचा नाबार्डमध्ये समावेश करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत .

– आ. जयकुमार गोरे

आ. जयकुमार गोरेंनी लावली होती राजकीय कारकीर्द पणाला ……

लोकसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आ. जयकुमार गोरे यांनी घेतला होता. त्यावेळी आ. गोरेंनी राजकीय कारकीर्दच पणाला लावली होती. निवडणूक निकालावर त्यांचे भवितव्य अवलंबून होते. माण आणि खटावच्या पाणीप्रश्नासाठी त्यांनी फार मोठी जोखीम पत्करली होती. मुख्यमंत्र्यांकडे त्यावेळी त्यांनी काही कामांबाबत शब्द टाकले होते. लोकसभा निवडणूकीत खा. निंबाळकर निवडून आले आणि मुख्यमंत्र्यांनीही आ. गोरेंना दिलेले शब्द पाळले. त्यांनी माण खटावच्या 64 गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अनेक निर्णय घेतले. लवकरच जिहे-कठापूर आणि टेंभू योजनेचे पाणी वंचित भागाला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment