माथाडी कामगार असल्याचे सांगून विश्वास संपादन; नोकरी लावण्याचे आश्वासन देत फसवणूक केल्याचा आरोप
वर्षभरापूर्वी पोलिसांत तक्रार, पैसे परत न मिळाल्याने पुन्हा धाव; प्रकाश हुलवान आणि अर्जुन साळुंखे यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
कराड | सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रकाश रामचंद्र हुलवान (रा. कार्वे, ता. कराड) आणि अर्जुन विलास साळुंखे (रा. पिंपरी, ता. कोरेगाव) यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार आबासो ज्योती पिसाळ (रा. चोराडे, ता. खटाव) यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोराडे येथील आबासो पिसाळ यांचा थोरला मुलगा प्रमोद हा नोकरीच्या शोधात होता. त्याचदरम्यान प्रमोदचा मित्र अर्जुन साळुंखे याने प्रकाश हुलवान याच्याशी त्याची ओळख करून दिली. हुलवान हा माथाडी कामगार मंडळात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. या ओळखीच्या माध्यमातून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून पिसाळ कुटुंबीयांनी पैसे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नोकरी मिळेल आणि मुलाचे भविष्य सुरक्षित होईल, या अपेक्षेने कुटुंबीयांनी चार लाख रुपये दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, आश्वासनानुसार नोकरी मिळाली नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
वर्षभरापूर्वी तक्रार; पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा
या प्रकरणात यापूर्वी १७ एप्रिल २०२५ रोजी आबासो पिसाळ यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यावेळी पोलिसांनी संबंधितांना बोलावून त्यांचे म्हणणे नोंदवले होते. पैसे परत मिळतील, या अपेक्षेने पिसाळ यांनी प्रतीक्षा केली; मात्र रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा पोलिसांत तक्रार दिली.
नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
0 Comments