Hot Posts

6/recent/ticker-posts

दसऱ्यानिमित्त पुसेगावमध्ये वाहतुकीत बदल; पाच पर्यायी मार्ग जाहीर


२० ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध; सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक वळवली

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

पुसेगाव (ता. खटाव) येथे विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त मंगळवारी (दि. २० ऑक्टोबर) दुर्गादेवीच्या मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकांसाठी सातारा जिल्ह्यातून सुमारे २५ ते ३० हजार भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुसेगाव शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा-पंढरपूर राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी ५ ते रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जारी केले आहेत.

सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, मोठे ट्रक आणि अन्य अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच दुर्गादेवीच्या मिरवणुका आणि भाविकांची गर्दी यामुळे पुसेगाव शहरातून जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. भाविक, नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय टाळून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

असे असतील पर्यायी मार्ग

१. सातारा ते दहिवडी : साताऱ्याकडून दहिवडीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुसेगाव शहरात न जाता नेर फाटा, नेर गाव, ललगुण, बुध, राजापूर, कुळकजाई आणि मलवडी मार्गे दहिवडीकडे वळवण्यात आली आहे.

२. दहिवडी ते सातारा : दहिवडीकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक कटगुण, खातगुण फाटा, खातगुण गाव, जाखणगाव, विसापूर आणि विसापूर फाटा (औंध फाटा) मार्गे साताऱ्याकडे जाईल. पर्यायी मार्ग म्हणून पिंगळी, वडूज चौकीचा आंबा, विसापूर आणि विसापूर फाटा (औंध फाटा) मार्गाचाही वापर करता येईल.

३. वडूज ते फलटण : वडूजकडून फलटणकडे जाणारी वाहतूक पुसेगावमध्ये न येता खटाव, जाखणगाव, विसापूर, विसापूर फाटा (औंध फाटा), नेर फाटा, नेर गाव, ललगुण आणि बुध मार्गे फलटणकडे वळवण्यात आली आहे.

४. फलटण ते वडूज : फलटणकडून वडूजकडे जाणारी वाहतूक पुसेगावमार्गे न जाता ललगुण, नेर गाव, नेर फाटा, विसापूर फाटा, विसापूर, जाखणगाव आणि खटाव मार्गे वडूजकडे जाईल.

५. पुसेगाव शहरातील मिरवणूक मार्ग बंद : दुर्गादेवीच्या मिरवणुकीचा मार्ग मंगळवारी सायंकाळी ५ ते रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांना पोलिसांचे आवाहन

वाहतूक वळवण्यात येणाऱ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी अधिसूचनेतील पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments