Hot Posts

6/recent/ticker-posts

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; सालपे स्थानकाजवळ दरोडेखोरांची दगडफेक

सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून रेल्वे थांबवली; तीन महिलांचे दोन लाखांचे सोन्याचे दागिने लुटले, वर्षभरातील तिसरी घटना
सातारा : रविवारी पहाटे मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून रेल्वे थांबविण्यात आली. त्यानंतर ५ ते ६ दरोडेखोरांनी प्रवाशांना लक्ष्य करत तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेले. यावेळी दरोडेखोरांनी दगडफेक केल्याचीही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात अशा प्रकारची ही तिसरी घटना असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना सालपे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत छेडछाड करण्यात आली. त्यामुळे रेल्वे थांबली. याच संधीचा फायदा घेत ५ ते ६ दरोडेखोरांनी रेल्वे डब्यात प्रवेश करून महिला प्रवाशांना लक्ष्य केले. तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेत दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी त्यांनी दगडफेक केल्याचीही माहिती आहे.
विशेष म्हणजे, रेल्वेत तीन सुरक्षा कर्मचारी उपस्थित असतानाही दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे थांबवून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यात रेल्वे प्रवासादरम्यान अशा प्रकारच्या घटना वर्षभरात तिसऱ्यांदा घडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावरील गस्त, सिग्नल यंत्रणेची सुरक्षा आणि प्रवाशांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments