Hot Posts

6/recent/ticker-posts

निर्दयी खुनी पतीला जन्मठेप, उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला यश, कराड न्यायालयाचा निर्णय

 

सत्य सह्याद्री/उंब्रज

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून स्वतःच्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. मे २०१९ मध्ये कराड तालुक्यातील चोरे येथे घडलेल्या या खळबळजनक गुन्ह्याचा उंब्रज पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याने आरोपीला ही कठोर शिक्षा मिळण्यास मदत झाली आहे.

सदरची धक्कादायक घटना दिनांक २० मे २०१९ रोजी मौजे चोरे (ता. कराड) येथील बेघरवस्तीतील ग्रामपंचायत मिळकत नंबर ९५२ मधील राहत्या घरात घडली. 

यातील आरोपी आनंदा दादू सातपुते (वय ५२ वर्षे, रा. चोरे) याने दारूसाठी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून चिडून जाऊन पत्नी   शशिकला यांच्याशी कडाक्याचे भांडण केले. रागाच्या भरात त्याने घरात असलेली कुऱ्हाड घेऊन, झोपलेल्या अवस्थेत असलेल्या पत्नीच्या डाव्या कानालगत व खालील बाजूस सलग दोन वर्मी घाव घातले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा आकाश सातपुते (वय २२) याने दिलेल्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात भादंवि कलम   अन्वये खुनाचा गुन्हा  दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड यांनी तत्परतेने शोध घेत २४ मे २०१९ रोजी दुपारी ३:१८ वाजता आरोपी आनंदा सातपुते याला अटक केली. 

तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व मयताच्या अंगावरील कपडे जप्त करून वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची भक्कम साखळी तयार केली व न्यायालयात परिपूर्ण दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची  सुनावणी कराड येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. संतोष शिंदे साो. यांच्यासमोर पार पडली. सुनावणीदरम्यान एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले शास्त्रोक्त पुरावे आणि सरकारी वकील  एम. व्ही. कुलकर्णी साो. यांनी केलेला भक्कम युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने रोजी आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (कराड विभाग) राजश्री पाटील आणि उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या खटल्यात न्यायालयीन कामकाजासाठी  पैरवी अधिकारी हवालदार एस. एम. मुळे  आणि वरीष्ठ हवालदार पी. एच. कार्वेकर  यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments