Hot Posts

6/recent/ticker-posts

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून कोंडवे येथील वृद्धाला ३२ लाखांचा गंडा!

 


वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक; मोबाईलधारकासह तीन बँक खातेधारकांवर गुन्हा

कोंडवे | सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा तालुक्यातील कोंडवे येथील ६७ वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल ३२ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका मोबाईलधारकासह ज्या तीन बँक खात्यांवर पैसे जमा करण्यात आले, त्या खात्यांच्या धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू ऊर्फ बाळासाहेब तुकाराम भोसले (वय ६७, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडिओ कॉल करून अटकेची भीती

भोसले यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तींनी आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्यावर गंभीर आरोप केले. 'द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' या संघटनेतील लोकांशी तुमचा संपर्क असून, त्यांना दोन कोटी रुपये गोळा करून दिले आहेत. त्यापैकी २० लाख रुपये तुम्हाला मिळाल्याची माहिती असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात एकूण २४७ लोकांचा सहभाग असल्याचेही भासवण्यात आले.

या आरोपांमुळे घाबरलेल्या भोसले यांना संबंधितांनी डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडील पैशांची रिझर्व्ह बँकेमार्फत तपासणी करायची असल्याचे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम जमा करण्यास भाग पाडले.

३२ लाख ६० हजार रुपये उकळले

अटकेची भीती आणि कारवाई टाळण्याच्या दबावामुळे भोसले यांनी संबंधितांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण ३२ लाख ६० हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या तक्रारीनंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नीलेश तांबे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा प्रकार

पोलीस अधिकारी असल्याचे भासवणे, गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवणे आणि तपासाच्या नावाखाली बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगणे, अशा पद्धतीने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारचा फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास घाबरून पैसे जमा न करता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments