सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; ३ हजार ५०० रुपयांची रक्कम स्वीकारताना ताब्यात
दहिवडी | सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
माण (दहिवडी) येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाला ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) रंगेहात पकडले. मेघराज बाळासो जाधव (वय ३४) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानाचा मासिक धान्य कोटा मंजूर करणे तसेच कोटा वाढवून देण्यासाठी माण (दहिवडी) तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मेघराज जाधव यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने २७ ऑक्टोबर रोजी माण तहसील कार्यालयात लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने तक्रारदाराच्या स्वस्त धान्य दुकानाचा ऑक्टोबर २०२६ चा मासिक धान्य कोटा मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात तसेच पुढील कामासाठी ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माण तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेजवळ सापळा रचला. या कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर जाधव यांना पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
0 Comments