गोंदवले :
माण तालुक्यातील भाटकी गावच्या हद्दीत दिवसाढवळ्या, निर्मनुष्य भागात शेळ्या-मेंढ्या राखत असलेल्या एका महिला शेतकरी महिलेचा गळा दाबून व तोंड बळजबरीने दाबून तब्बल ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. या धाडसी चोरांमुळे परिसरात महिला वर्गामध्ये दहशत पसरली आहे.
दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास भाटकी (ता. माण गावच्या हद्दीतील फॉरेस्ट विभागाजवळ असलेल्या खंडोबा मंदिराकडील रस्त्यावर सौ. रेश्मा सुभाष कोडलकर (वय ३६ वर्षे, रा. भाटकी या नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या-मेंढ्या राखन करण्याचे काम करत होत्या.
त्याच वेळी, माळशिरस बाजूकडून भाटकी फाट्यावरून भाटकी गावाकडे एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून अंदाजे २० ते २५ वयोगटातील दोन अनोळखी इसम संशयास्पदरीत्या आले. त्यातील एका इसमाने दुचाकी थांबवली, तर पाठीमागे बसलेला इसम अचानक खाली उतरला. काही समजण्याच्या आतच त्या नराधमांनी महिलेचे अचानक नरडे धरले आणि दुसऱ्या इसमाने त्यांचे तोंड दाबून धरले. याच संधीचा फायदा घेत त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ६०,००० रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (ज्यात सोन्याच्या दोन वाट्या व काळ्या मण्यांमध्ये ३० सोन्याचे लहान मणी असलेले) जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर दोघेही त्याच काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून माळशिरस बाजुकडे सुसाट वेगाने पसार झाले.
दिवसाढवळ्या घडलेल्या या जबरी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पोमण यांनी प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास ए.एस. शिंदे हे करत आहेत. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसह खबऱ्यांचे जाळे पसरवण्यात आले असून, लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद केले जाईल, अशी माहिती म्हसवड पोलिसांनी दिली आहे.

0 Comments