Hot Posts

6/recent/ticker-posts

कराडमध्ये शुक्रवारपासून दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची माहिती; पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कराड : प्रतिनिधी

तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि कोयना नदीपात्रातील घटलेली पाणीपातळी लक्षात घेऊन कराड नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नेहमीप्रमाणे दिवसातून दोनवेळा पाणीपुरवठा होईल. मात्र, १२ नोव्हेंबरपासून पुन्हा दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, पाणीपुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह सभापती आणि सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

पाण्याचा उपसा घटला; १० टक्के कपातीचे निर्देश

नगराध्यक्ष यादव म्हणाले, कराड शहराची लोकसंख्या ९० हजार ८५५ असून, दररोज शहरात येणाऱ्या सुमारे २५ हजार नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शहराची एकूण लोकसंख्या एक लाख १५ हजारांवर पोहोचते. या लोकसंख्येला नगरपालिकेकडून दररोज २१.६ एमएलडी अर्थात दोन कोटी १६ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वारुंजी येथील जॅकवेलमधून सुमारे १८ तास पंपिंग करावे लागते.


यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने कोयना नदीपात्रातील पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे वारुंजी येथील जॅकवेलमधून होणारा पाण्याचा उपसा कमी झाला असून, शहराची दैनंदिन पाण्याची गरज भागविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणीपुरवठ्यात किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याचे नियोजन पालिकेला करावे लागत असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना

शहरातील पाणीपुरवठ्याची क्षमता वाढविण्यासाठी वारुंजी येथील जॅकवेलमधील गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. तसेच पंकज हॉटेल परिसरातील जुन्या जॅकवेलची दुरुस्ती व पुनर्बांधणी करून त्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील मुख्य वितरण वाहिन्यांवरील गळती शोधून ती दुरुस्त करण्याची कार्यवाहीही करण्यात येणार आहे.

पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची नासाडी टाळावी आणि पालिकेच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष यादव यांनी केले. पाण्याची नासाडी करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

एकवेळ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक

एमबीआर पाण्याची टाकी : सायंकाळी ६ ते ८

रविवार पेठ टाकी : सकाळी ७.३० ते ८.४५

मार्केट यार्ड टाकी : सकाळी ६ ते ७.३०

सूर्यवंशी मळा बाजूचा झोन : सायंकाळी ६.३० ते ७.३०

मुजावर कॉलनी बाजूचा झोन : सायंकाळी ७.३० ते ८.३०

टाऊन हॉल टाकी : सायंकाळी ६.३० ते ७.३०

गजानन हाऊसिंग सोसायटी : सायंकाळी ६.३० ते ७.३०

रुक्मिणीनगर टाकी : सायंकाळी ६.३० ते ७.३०

जुनी सोमवार पेठ टाकी : सकाळी ६ ते ७

नवी सोमवार पेठ टाकी : सकाळी ६ ते ७

नागरिकांनी आपल्या भागातील निर्धारित वेळेनुसार पाण्याचा वापर करावा, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments