Hot Posts

6/recent/ticker-posts

१२ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून, पित्याला जन्मठेप, सातारा जिल्हा न्यायालयाचा निकाल

 


मृतदेह उसाच्या शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

खटाव / सातारा : सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

स्वतःच्या १२ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विजय आनंदराव खताळ (वय ३५, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) हा निकाल दिला. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व तीन हजार रुपये दंड, तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.



मुलाचा गळा आवळून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय खताळ याने २३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातील गाईला बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीने आपला मुलगा विक्रम ऊर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलाचा मृतदेह स्वतःच्या उसाच्या शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

आपल्याला कर्करोग झाला असून आपण मरणार आहोत आणि आपल्या मृत्यूनंतर मुलाचे हाल होतील, या विचारातून हे कृत्य केल्याचे आरोपीने सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परिस्थितीजन्य पुराव्यांवरून दोष सिद्ध

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. भोसले यांनी केला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (डीजे-२) एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता एम. कुलकर्णी आणि तत्कालीन जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती लकडे यांनी कामकाज पाहिले.

दोन्ही गुन्ह्यांत शिक्षा

भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, तर कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर, कोरेगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मेळावणे यांनी खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments